Gotya Gite: गोट्या गीतेने आणखी खून केले तर...? पोलिस महासंचालक जबाबदारी घेणार का? अंजली दमानियांचा सवाल
esakal September 21, 2025 11:45 AM

बीड पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. वाल्मिक कराड, ज्याला सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर पोलिसांनी अटक केली होती, तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. मात्र त्याचा पंटर गोट्या गीते याच्यावरील मकोका रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे बीडमध्ये चर्चेचा विषय निर्माण झाला आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही या निर्णयावर आक्षेप घेतला आहे.

अंजली दमानिया यांनी गोट्या गीतेवर दाखल असलेल्या गुन्ह्यांची यादीच शेअर केली आहे. एक्सवर त्या म्हणाल्या, “बीडचा वाल्मिक कराड गँगचा गोट्या गीतेवर १६ गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर लागलेला मकोका पोलिस महासंचालक मॅडमनी का रद्द केला? उद्या ह्या माणसाने आणखी खून केले तर त्याची जबाबदारी डीजी मॅडम घेणार का?”

Beed Railway: परळीकरांचा ७५ वर्षांनी प्रवास, आदमानेंनी पहिल्यांदा पाहिली रेल्वे; १२९४ जणांचा तिकीट काढून प्रवास परळीकरांचा

त्या पुढे म्हणाल्या, “पोलिस अधीक्षक आणि पोलिस महानिरीक्षक मकोकाचा प्रस्ताव उगाच पाठवतात का? ही ५ नावे का वगळण्यात आली, याचे उत्तर पोलिस महासंचालक कार्यालयाने तत्काळ दिले पाहिजे. ताबडतोब फेरविचार करून हा निर्णय मागे घेतला पाहिजे. आम्ही जीवाची पर्वा न करता ह्याच्या विरोधात लढलो, मग पोलिस महासंचालक कार्यालय बेजबाबदारपणे मकोका रद्द कसा करू शकते?”, असा सवाल अंजली दमानिया यांनी केला आहे.

कोण आहे गोट्या गीते?

वाल्मिक कराड तुरुंगात असताना गोट्या गीतेने सोशल मीडियावर पोस्ट केली होती. “अण्णा माझं दैवत, सदैव सोबत” असं लिहित एक रील्स टाकलं होतं. त्याच्यावर बीडमध्ये अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. बीड, लातूर, परभणी, पुणे अशा ठिकाणी एकूण १६ गुन्हे आहेत.

गोट्या गीते हा परळीतल्या नंदागौळ गावचा रहिवासी आहे. तो धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्या जवळचा असल्याची चर्चा आहे. जितेंद्र आव्हाड यांनी देखील याबाबत आरोप केले होते. त्याचं खरं नाव ज्ञानोबा उर्फ गोट्या मारुची गीते असं आहे. गेल्या १५ वर्षांपासून त्याच्यावर विविध गुन्हे दाखल आहेत.

सरपंच बापू आंधळे प्रकरणात महादेव गीतेवर गुन्हा दाखल झाला होता. पण चौकशीत त्याने गोट्या गीतेचं नाव घेतलं. त्यानंतर गोट्या गीतेवरही गुन्हा दाखल झाला. बीड जिल्ह्यात अनेक अवैध कामांमध्ये त्याचं नाव आहे. चोरी करणे, धमकावणे, गावठी कट्टे बाळगणे असे अनेक गंभीर गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत.

Beed : वाल्मिक कराडचा राईट हॅंड गोट्या गितेसह ५ जणांना मोठा दिलासा, मकोका रद्द
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.