Kolhapur Crime News : शालेय वयात दोघांना घोडागाडी शर्यतीचा नाद लागला. भागातील पोरांसोबत माळावर फिरण्यामुळे शाळेकडे दुर्लक्ष झाले. हळूहळू दोघेही या फेऱ्यात अडकत गेल्याने शिक्षण सुटलेच; पण घोडागाडीसोबत दुचाकी पळविण्यासाठी कोणी घेत नसल्याने दुचाकी चोरीचा दोघांनी निर्णय घेतला. एकाने विद्यापीठ परिसरातून, तर दुसऱ्याने राजेंद्रनगरातून दुचाकी चोरली. राजारामपुरी पोलिसांनी शिताफीने दोघा अल्पवयीन मुलांना पकडून चोरीची वाहने जप्त केली.
फिर्यादी ईश्वर विठ्ठल पाटील (वय ४८, रा. प्रयाग चिखली) यांची मोपेड ३० ऑगस्टला विद्यापीठ परिसरातून चोरीस गेली होती, तर अल्लाउद्दीन रजाक शेख (६०, रा. राजेंद्रनगर) यांची दुचाकी त्यांच्या घरासमोरून चोरीस गेली होती. या चोऱ्यांची नोंद राजारामपुरी पोलिस ठाण्यात करण्यात आली होती. पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी दुचाकी चोरीच्या घटना रोखण्यासाठी याचा सखोल तपास करण्याचे आदेश दिले होते. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे संशयित चोरट्यांची माहिती मिळून आली.
पोलिसांनी संशयितांकडे केलेल्या चौकशीत सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. पण, फुटेजसह इतर माहिती दाखवताच दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली. या दुचाकी घरापासून दूरवर लावून ठेवल्या होत्या. घोडागाडी शर्यतीत या दुचाकी पळविण्यासाठी त्यांचा वापर करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. कारवाईत हवालदार कृष्णात पाटील, संदीप सावंत, सचिन पाटील, विशाल शिरगावकर, सुशांत तळप, अमोल पाटील यांनी सहभाग घेतला.
घरच्यांना कल्पनाच नाही...
संशयित मुले दिवसभर कोठे असतात, काय करतात, याची माहिती कुटुंबीयांना नसल्याचे कारवाईत समोर आले. एकाने चोरीची दुचाकी घोड्यांच्या तबेल्याच्या परिसरात उभी केली होती. तो सवडीने तिथे जाऊन दुचाकी फिरवून पुन्हा तबेल्याजवळच लावत होता. दोघे दुचाकी वापरतात, याची पुसटशी कल्पनाही घरच्यांना नव्हती.