प्रशांत ननावरे - nanawareprashant@gmail.com
काही मोजक्या मराठी आणि दक्षिण भारतीय पदार्थांपासून झालेल्या सुरुवातीनंतर गिरगावातील ‘वसंत भुवन’चा मेन्यू आता चारशे पदार्थांनी सजलेला आहे. नाष्ट्याचे पदार्थ, पावभाजी, सँडविच, भाज्या, सॅलड, ज्यूस, चायनीज, कॉन्टीनेंटल पदार्थ आणि थाळी असे असंख्य पर्याय येथे उपलब्ध आहेत. हॉटेलमध्ये शिरलेली व्यक्ती आपल्या आवडीचं इथे काहीच नाही आणि बाहेर पडली असं इथे कधीच होत नाही.
समाजसुधारक’ या मासिकाच्या मे १९४५च्या अंकात छापून एक जाहिरात छापून आलेली. ‘लग्नसमारंभ व पार्टीकरिता वसंत भवनांतच प्रथम चौकशी करा.’ त्याखाली ‘आमची शिफारस’ या हेडिंगखाली गरम, ताजे व रूचकर पदार्थ - माफक दर - वेळेवर आणि ताबडतोब ऑर्डर पोहोचवणे असे तीन ठळक मुद्दे. शेवटी संपर्क क्रमांक... वाचायला आणि पाहायला किती गंमत वाटते. हॉटेलमध्ये जाऊन खाणं हा जेव्हा चैनीचा काळ किंवा नित्यनेमाचं नव्हतं त्या वेळी हॉटेलच्या मार्केटिंगसाठी असा विचार करणारी माणसं किती पुढारलेली असतील, याची कल्पना येऊ शकते. खरंतर मूळ मालकांनंतर आजवर चार ते पाच वेळा हॉटेलचे मालक बदलले असले तरी ज्या नावाने हॉटेल सुरू झाले होते, त्याच नावाने आजही ते सुरू आहे. शिवाय त्यांच्या हुशारीची परंपरा हॉटेलच्या विद्यमान मालकांनीही टिकवून ठेवली आहे. म्हणूनच शहराचा भूगोल, लोकवस्ती, व्यवसायाची गणिते आणि लोकांच्या आवडीनिवडी बदलल्या असल्या तरी नऊ दशकांनंतरही ‘वसंत भुवन’ मूळ जागेवर आणि लोकांच्या हृदयात आपले बस्तान बसवून आहे.
गायतोंडे यांनी १९३४ साली आपल्या कैलासवासी मुलाच्या प्रेमापोटी आणि आठवण म्हणून ‘वसंत भुवन’ या नावाने हॉटेल सुरू केलं. गायतोंडेंची मुलगी रुक्मिणीबाई यांचे लग्न कारवारच्या कृष्णा बाळगींसोबत झाल्यानंतर गायतोंडेंनी हे हॉटेल रुक्मिणीबाईंना आंदण म्हणून दिले. कृष्णा यांनी काही दिवस हॉटेल चालवल्यानंतर कुण्या शेट्टीने ते चालवायला घेतलं. १९५५च्या आसपास अवतारसिंग यांनी त्याच जागी ‘शेर-ए-पंजाब’ या नावाने हॉटेल सुरू केलं आणि तब्बल २५ वर्षे ते यशस्वीरीत्या चालवलं. त्या वेळी तिथे मांसाहारी पदार्थदेखील मिळायचे. हा नाईलाजाने अमलात आणलेला अपवाद होता. बाळगींच्या कुटुंबातील पुढच्या पिढीचे शिलेदार अनंत बाळगींना त्यांचा उद्देश रूचला नाही आणि त्यांनी ‘शेर-ए-पंजाब’सोबतचा करार संपुष्टात आणला. मग रंगप्पा कामत यांनी ते हॉटेल चालवायला घेऊन २० वर्षे म्हणजेच १९९८ पर्यंत अतिशय नेटाने खिंड लढवली. सर्वकाही सुरळीत सुरू असताना बाळगी कुटुंबाला पुन्हा त्यामध्ये स्वारस्य वाटू लागले. त्यांनी कामतांसोबतचा करारही रद्द करून स्वत: हे हॉटेल चालवायला घेतले; मात्र सहा-सात वर्षांतच ते बंद पडले. काळ, लोकांच्या खाण्यापिण्याच्या सवयी बदलत होत्या, गोष्टींच्या किमती वाढत होत्या, या सर्व पार्श्वभूमीवर नवीन मालकांचा शोध सुरू झाला.
२००६च्या सुमारास दयानंद मापुस्कर हे रेडिओ कंट्रोल टॉयचं दुकान चालू करण्यासाठी नवीन मोठ्या जागेच्या शोधात होते. त्यांना ही जागा पसंत पडली; मात्र हॉटेल पुन्हा सुरू केल्याशिवाय त्याजागी ‘ट्रान्स्फर ऑफ बिझनेस’चा करार करता येणार अशी अट घातल्याने मापुस्करांनी केवळ वास्तू आवडल्यामुळे त्यात उडी घेतली. तसं पाहायला गेलं तर त्यांच्यासाठी हॉटेल व्यवसाय नवीन नव्हता. दयानंद यांचे आजोबा धोंडू मापुस्कर विडी, सुपारी आणि तंबाखूचे मोठे व्यापारी होते. गिरगावात त्यांचे फार पूर्वी ‘गजानन टी हाऊस’ नावाचे छोटेखानी हॉटेलसुद्धा होते. शिवाय, आई-वडील मालती आणि माधव मापुस्कर त्यांचे मसाले, पाककृतींसाठी परिचितांमध्ये प्रसिद्ध होते. साहाजिकच तो वारसा दयानंद यांच्याकडे आलेला. दयानंद यांनी ‘वसंत भुवन’चे पुनरुज्जीवन करायचे ठरवले. सर्वप्रथम त्यांनी त्याचे मूळ नाव त्याला बहाल केले आणि काही वर्षांतच विस्कटलेली आर्थिक घडी नीट बसवली. आजघडीला गेली अठरा वर्षे हा व्यवसाय फायद्यात चालवण्याचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे.
काही मोजक्या मराठी आणि दक्षिण भारतीय पदार्थांपासून झालेल्या सुरुवातीनंतर ‘वसंत भुवन’चा मेन्यू आता चारशे पदार्थांनी सजलेला आहे. नाष्ट्याचे पदार्थ, पावभाजी, सँडविच, भाज्या, सॅलड, ज्यूस, चायनीज, कॉन्टीनेंटल पदार्थ आणि थाळी असे असंख्य पर्याय येथे उपलब्ध आहेत. हॉटेलमध्ये शिरलेली व्यक्ती आपल्या आवडीचं इथे काहीच नाही आणि बाहेर पडली असं इथे कधीच होत नाही. साजुक तुपातील उपमा आणि शिरा, पोहे, मिसळ पाव, दक्षिण भारतीय पदार्थांसाठी सकाळी गर्दी असते. दुपारी आणि रात्री अवघ्या दोनशे रुपयांत परिपूर्ण आणि भरपेट थाळी मिळते. शिवाय, इतरवेळी आल्यास असंख्य नाष्ट्याचे आणि जेवणाचे पदार्थ जिभेचे चोचले पुरवण्यासाठी उपलब्ध असतात. चांगल्या प्रतीचे आणि भरपेट पदार्थ ही ‘वसंत भुवन’ची सुरुवातीपासून खासियत राहिलेली आहे. म्हणूनच प्रत्येक जण तृप्तीचा ढेकर देतच इथून बाहेर पडतो.
इतरांशी स्पर्धा करण्यापेक्षा आपले वेगळेपण जपण्यावर दयानंद यांचा प्रयत्न असतो. इथली मिक्स कडधान्याची मिसळ, चीज पकोडे, पावभाजी आणि दक्षिण भारतीय पदार्थ खायला लोकं आवर्जून जातात. इथल्या चहाची चव वर्षानुवर्षे कायम आहे, असा दयानंद यांचा दावा आहे. तो पिण्यासाठी जुनी माणसं वाट वाकडी करून येत असतात. सगळ्या प्रकारचे पदार्थ खायला आवडत असले तरी स्वत: शाकाहारी असल्यामुळे शाकाहारी पर्याय कसा वेगळा आणि चवदार करता येईल, याकडे दयानंद यांचा कल असतो. ‘वसंत भुवन’ शाकाहारी असण्यालाही इतिहास आहे. लॅमिंग्टन रोडवरील ज्या माणेक चेंबर्समध्ये हॉटेल आहे, त्याजागी आधी हनुमानाचे मंदिर होते. इमारत बांधण्याच्या प्रक्रियेत मंदिर रस्त्याच्या आतल्या बाजूस हलविण्यात आले. त्यामुळे गायतोंडेंच्या काळापासून या जागेत शाकाहारीच पदार्थ बनवण्याची अघोषित अट आहे.
दोन दशकांपूर्वीचा लॅमिंग्टन रोड वेगळा होता. कॉम्प्युटर क्रांतीमुळे केवळ मुंबईच नाही तर बाहेरगावाहूनही कॉम्प्युटर आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी मोठ्या संख्येने लोक येत असतं. शिवाय, बहुतांश सरकारी आणि खासगी कंपन्यांची कार्यालये याच भागात असल्याने लोकांचा प्रचंड राबता असे. ऐसपैस जागा, शाकाहारी पदार्थ, खाण्यासाठीचे पर्याय आणि माफक दर यामुळे नोकरदार मंडळी आणि खरेदीसाठी येणाऱ्या मंडळींसाठी ‘वसंत भुवन’ हक्काचे ठिकाण होते. याच रस्त्यावर पूर्वी आठ ते दहा एक पडदा चित्रपटगृहेसुद्धा होती. तिथे लागणाऱ्या सिनेमांचे खेळ सुरू होण्यापूर्वी आणि नंतर हॉटेलमध्ये पार्टीचे वातावरण असे. याच रस्त्यावर मराठी, इराणी, उत्तर भारतीय पदार्थ मिळणारी हॉटेल्स एकमेकांना खेटून होती. म्हणजे खाण्यासाठी पर्याय नव्हते असं नाही तर लोकं ठरवून आवडते पदार्थ खाण्यासाठी येथे जायची आणि आजही जातात.
दक्षिण मुंबई परिसरात मराठी समुदायासोबतच पूर्वीपासून गुजराती, मारवाडी, जैन, पारशी, ख्रिश्चन, मुस्लिम समुदायाची लोकंही राहतात. परदेशातील पर्यंटक मुंबईत आल्यानंतर याच भागात फिरताना दिसतो. ही सर्व मंडळी वर्षानुवर्षे ‘वसंत भुवन’च्या वाऱ्या करत आहेत. पर्यटनासाठी येणारे इस्राईली लोकं येथे आवर्जून येतात. हल्ली इतक्या झपाट्याने खाण्याचे ट्रेंड बदलतात की सतत अपग्रेड होत राहावं लागतं, असं दयानंद सांगतात. असं असलं तरी नव्वद वर्षांनंतर बोर्डावरील ‘वसंत भुवन’ हे नाव आणि स्थापना १९३४ हे पाहून लोकं आत चांगलं काहीतरी खायला मिळेल, या आशेने प्रवेश करतात. बाहेर पडताना त्यांच्या चेहऱ्यावर वसंत फुललेला असतो. हॉटेल व्यावसायिकाला आणखी काय हवं असतं.