मुंबई : भारतीय शेअर बाजारात 15 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर या कालावधीमध्ये तेजी आणि घसरण पाहायला मिळाली असली तर गुंतवणूकदारांना चांगला फायदा झाला आहे. बीएसई सेन्सेक्समध्ये या आठवड्यात 721.53 अंकांची वाढ झाली. सेन्सेक्सवरील टॉप-10 कंपन्यांपैकी 7 कंपन्यांच्या बाजारमूल्यात मोठी वाढ पाहायला मिळाली. या कंपन्यांच्या गुंतवणूकदारांनी पाच दिवसात मोठी कमाई केली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या गुंतवणूकदारांना दमदार परतावा मिळाला आहे. या पाच दिवसांच्या काळात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 35 हजार कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
15 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर या काळात शेअर बाजारातील सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी ज्या सात कंपन्यांच्या स्टॉकमध्ये तेजी आली त्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, भारत एअरटेल, रिलायन्स इंडस्ट्रीज याशिवाय टीसीएस, इन्फोसिस, एचडीएफसी बँक आणि एलआयसीचा समावेश आहे. तर, आयसीआयसीआय बँक, बजाज फायनान्स आणि हिंदूस्तान यूनिलीवरच्या गुंतवणूकदारांचं नुकसान झालं.
भारतीय शेअर बाजारावर 15 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर या कालावधीत सर्वाधिक कमाई करणाऱ्या कंपन्यांच्या यादीत पहिल्या स्थानावर स्टेट बँक ऑफ इंडिया आहे. बँकेचं बाजारमूल्य वाढून 795910 कोटी रुपये झालं आहे. या पाच दिवसांच्या काळात स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शेअरमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांनी 35953.25 कोटी रुपयांची कमाई केली आहे. भारती एअरटेलचं बाजारमूल्य 33214.77 कोटी रुपयांनी वाढून 11,18,952.64 कोटी रुपये झालं आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचं बाजारमूल्य 17389.23 कोटी रुपयांनी वाढून 19,04,898.51 कोटी रुपये झालं आहे.
टाटा ग्रुपच्या टीसीएस कंपनीचं बाजारमूल्य 12952.75 कोटी रुपयांनी वाढून 1146879.47 कोटी रुपये झालं आहे. एलआयसीचं बाजारमूल्य 12460.25 कोटी रुपयांनी वाढलं असून ते 565612.92 कोटी रुपये झालं आहे. भारताची दुसरी मोठी आयटी कंपनी इन्फोसिसचा विचार केला असता त्याचं बाजारमूल्य 6127.73 कोटी रुपयांनी वाढून 6,39,901.03 कोटी रुपये झालं आहे. एचडीएफसी बँकेचं बाजारमूल्य 230.31 कोटी रुपयांनी वाढून 14,84,816.26 कोटी रुपये झालं आहे.
दुसरीकडे सेन्सेक्सवरील तीन कंपन्यांच्या बाजारमूल्यात घसरण झाली. यामध्ये आयसीआयसीआय बँक, बजाज फायनान्स आणि हिंदुस्थान यूनिलीवरचा समावेश आहे. आयसीआयसीआय बँकेंचं भाजारमूल्य 10707.87 कोटी रुपयांनी घसरुन 10,01,654.46 कोटी रुपयांवर पोहोचलं आहे. बजाज फायनान्सचं बाजारमूल्य 6346.93 कोटी रुपयांनी घसरलं, त्यांचं बाजारमूल्य 617892.72 कोटी रुपयांवर आलं. एचयूएलचं बाजारमूल्य 5039.87 कोटी रुपयांनी घसरुन 6,01,225.16 कोटी रुपयांवर आलं.
बाजारमूल्याच्या क्रमानुसार देशातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज आहे. त्यानंतर एचडीएफसी बँक, टीसीएस, भारती एअरटेल, आयसीआयसीआय बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, बजाज फायनान्स,एचयूएल आणि एलआयसी असा क्रम आहे.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
आणखी वाचा