भीषण आग – यड्राव (ता. शिरोळ) येथील पार्वती औद्योगिक वसाहतीतील श्री. कृष्णा एक्स्पोर्ट व श्री. बालाजी एक्स्पोर्ट या दोन वस्त्रोद्योग कारखान्यांना १८ सप्टेंबर रोजी मध्यरात्री भीषण आग लागली.
मोठे आर्थिक नुकसान – १० एअरजेट लुम मशीन, रिपेअरिंग साहित्य, सूत, कापड, वायरिंग, ए.सी. प्लान्ट आदी जळून एकूण ₹५ कोटी ५८ लाख २ हजार ५२५ रुपयांचे नुकसान झाले.
पोलिस तपास सुरू – शहापूर पोलिस ठाण्यात नोंद झाली असून आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही; पोलिस पुढील तपास करत आहेत.
Ichalkaranji Textile Mills Fire : यड्राव (ता. शिरोळ) येथील पार्वती औद्योगिक वसाहतीतील श्री. कृष्णा एक्स्पोर्ट व श्री. बालाजी एक्स्पोर्ट या दोन वस्त्रोद्योग कारखान्यांना भीषण आग लागली. या आगीत पाच कोटी ५८ लाख दोन हजार ५२५ रुपयांचे नुकसान झाले आहे. याबाबतची नोंद शहापूर पोलिस ठाण्यात झाली आहे.
ही घटना १८ सप्टेंबर रोजी मध्यरात्री दोनच्या सुमारास घडली. कारखान्याच्या आवारात अचानक आग भडकली. काही क्षणातच आगीने प्रचंड रौद्ररूप धारण केले. यात दोन्ही कारखान्यांतील २४ मशिनांपैकी तब्बल १० अत्याधुनिक ऑटोमेटिक शटललेस (एअरजेट) लुम मशीन जळून खाक झाली.
आगीत फक्त मशिनरीच नव्हे तर जॉबसाठी आलेले बीम सूत, वेफ्ट, शिल्लक कापड, तयार कापड व सूत यांचेही मोठे नुकसान झाले. तसेच, १४ मशीनच्या रिपेअरिंगसाठी लागणारे ड्रॉपिंग, हिल्ड वायर, हिल्ड फ्रेम, रिड (फनी), लुम कार्ड, प्रीवाईंडर आदी साहित्यदेखील पूर्णपणे जळाले आहे. धूर व पाण्यामुळे मोठ्या प्रमाणावर तयार कापड व सुताचे नुकसान झाले आहे.
याशिवाय वायरिंग, मोटार, ए.सी. प्लान्ट, एअर काॅम्प्रेसर पाईप लाईन, फॉल सिलिंग यासह कारखान्याची संपूर्ण संरचनाच आगीच्या तडाख्यात सापडली. या भीषण आगीत तीन कोटी ५० लाख रुपयांचे १० एअरजेट लुम मशीन, एक कोटी रुपयांचे रिपेअरिंग साहित्य, १७ लाख ६५ हजार ८०० रुपयांचे बीम सूत, दोन लाख ७७ हजार ७९० रुपयांचे वेफ्ट, दोन लाख ५८ हजार ९३५ रुपयांचे शिल्लक कापड, ५० लाख रुपयांचे तयार कापड व सूत, ३५ लाख रुपयांचे वायरिंग, मोटार, ए.सी. प्लान्ट, एअर काॅम्प्रेसर पाईप लाईन, फॉल सिलिंग असे साहित्य मिळून एकूण पाच कोटी ५८ लाख दोन हजार ५२५ रुपयांचे नुकसान झाले आहे.
याबाबतची वर्दी दिनेश सत्यनारायण बांगड (वय ५६, रा. आवाडे अपार्टमेंट, इचलकरंजी) यांनी दिली. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
Ichalkaranji Crime : इचलकरंजीत रक्तरंजीत थरार, प्रेमविवाहात मध्यस्थी केल्याचा रागातून बोटं तोडली; ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखलप्र.१: ही घटना कोठे व केव्हा घडली?
उ. – यड्राव (ता. शिरोळ) येथील पार्वती औद्योगिक वसाहतीत १८ सप्टेंबर रोजी मध्यरात्री दोन वाजता ही घटना घडली.
प्र.२: किती नुकसान झाले आहे?
उ. – सुमारे ₹५ कोटी ५८ लाख २ हजार ५२५ रुपयांचे नुकसान झाले आहे.
प्र.३: काय जळून खाक झाले?
उ. – १० एअरजेट लुम मशीन, सूत, तयार कापड, बीम, वेफ्ट, रिपेअरिंग साहित्य, वायरिंग, मोटार, ए.सी. प्लांट, एअर कॉम्प्रेसर पाईप लाईन, फॉल सिलिंग व कारखान्याची इतर संरचना.
प्र.४: आगीचे कारण समजले आहे का?
उ. – आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही; पोलिस तपास करत आहेत.