भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याची कायमच क्रिकेट विश्वाला प्रतिक्षा असते. टी 20i आशिया कप 2025 स्पर्धेनिमित्ताने दोन्ही शेजारी संघ हे दुसऱ्यांदा आमनेसामने येणार आहेत. भारताने साखळी फेरीत पाकिस्तानवर 7 विकेट्सने विजय मिळवला होता. त्यानंतर आता टीम इंडिया पुन्हा एकदा 21 सप्टेंबरला पाकिस्तानवर विजय मिळवण्यासाठी सज्ज झाली आहे. तर पाकिस्तान 14 सप्टेंबरच्या पराभवाची परतफेड करण्याच्या प्रयत्नाने मैदानात उतरणार आहे. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहे. या सामन्यानिमित्ताने पाकिस्तान विरूद्ध टी 20i क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या 5 भारतीय फलंदाजांबाबत जाणून घेऊयात.
विराट कोहली याने भारतासाठी पाकिस्तान विरुद्ध टी 20i क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा केल्या आहेत. विराटने भारताचं 2012 ते 2024 दरम्यान प्रतिनिधित्व केलं आहे. विराटने या दरम्यान पाकिस्तान विरुद्ध 11 सामन्यांमध्ये 70.28 च्या सरासरीने आणि 123.92 स्ट्राईक रेटने 492 केल्या आहेत. विराटने या दरम्यान 5 अर्धशतकं झळकावली आहेत.
विराटनंतर भारतासाठी पाकिस्तान विरुद्ध भारताचा माजी स्टार ऑलराउंडर युवराज सिंह याने सर्वाधिक धावा केल्या आहेत. युवीने 8 टी 20i सामन्यांमध्ये 155 धावा केल्या आहेत. युवीने या 155 धावांदरम्यान 1 अर्धशतक ठोकलं आहे.
विद्यमान प्रमुख प्रशिक्षक आणि माजी ओपनर गौतम गंभीर भारतासाठी पाकिस्तान विरुद्ध 5 टी 20 सामन्यांमध्ये 139 धावा केल्या आहेत. गंभीरची पाकिस्तान विरुद्धची 75 ही सर्वोच्च धावसंख्या होती.
रोहित शर्मा पाकिस्तान विरुद्ध भारतासाठी टी 20i क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा चौथा भारतीय आहे. रोहितने 12 सामन्यांमध्ये 127 धावा केल्या आहेत. रोहितने या दरम्यान 2 अर्धशतकं झळकावली आहेत.
टीम इंडियाचा टी 20i कॅप्टन सूर्यकुमार यादव याने पाकिस्तान विरुद्ध 111 धावा केल्या आहेत. सूर्याने एकूण 6 सामन्यांमध्ये या धावा केल्या आहेत. सूर्याची 47 ही सर्वोच्च धावसंख्या राहिली आहे. सूर्याने 22.20 च्या सरासरीने या धावा केल्या आहेत. सूर्याने या खेळीत 12 चौकार आणि 2 षटकार लगावले आहेत. सूर्याने पाकिस्तान विरुद्ध आणखी 45 धावा केल्यास तो भारतासाठी शेजारी संघाविरुद्ध सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज ठरेल. सूर्या यासह गंभीर, युवराज आणि रोहित या तिघांना मागे टाकेल.