Govind Barge case : उपसरपंच गोविंद बर्गे प्रकरणात पोलिसांची आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई, आता..
Tv9 Marathi September 21, 2025 09:45 PM

काही दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यातील लुखामसला गावचे उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आत्महत्या केल्याची घटना घडली होती, त्यांनी कला केंद्रात नर्तकी असलेल्या पूजा गायकवाड हिच्या घरासमोरच स्वत:वर गोळी झाडून आपलं जीवन संपवलं, या घटनेमुळे संपूर्ण राज्य हादरलं होतं, गोविंद बर्गे यांनी प्रेम प्रकरणातून ही आत्महत्या केल्याचं समोर आलं.

गोविंद बर्गे यांनी नर्तकी पूजा गायकवाड हिला सोन्याचे दागिने, सोन्याची नाणी,  प्लॉट, बुलेट, आयफोन, शेतजमीन एवढंच नाही तर घर देखील बांधून दिलं, मात्र पुजाची नजर ही गोविंद बर्गे यांच्या गेवराईच्या बंगल्यावर होती. हा बंगला माझ्या नावावर करून दे अशी मागणी तिने गोविंद बर्गे यांच्याकडे केली होती.  मात्र गोविंद बर्गे हे तिला गेवराईचा बंगला देण्यास तयार नव्हते, त्यासाठी ती सातत्यान त्यांच्यावर दबाव टाकत होती, याच दबावातून त्यांनी आत्महत्या केली असावी असा अंदाज आहे.

दरम्यान गोविंद बर्गे प्रकरणानंतर आता पोलिसांनी धाराशिवमधील कला केंद्रांविरोधात मोठी कारवाई केली आहे. जिल्ह्यातील एका कला केंद्राचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात आला आहे तर, पाच कला केंद्र चालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आता धाराशिवमधील कला केंद्र कायमचे बंद होणार अशी चर्चा सुरू झाली आहे.

कला केंद्रावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून अचानक धाड टाकण्यात आली, नियम भंग केल्याप्रकरणी पाच कला केंद्र चालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर उपसरपंच गोविंद बर्गे यांच्या आत्महत्येनंतर धाराशीवच्या वाशी येथील तुळजाई कला केंद्र कायमस्वरूपी बंद करण्यात आलं आहे.  कला केंद्राला परवाना देताना जे नियम व अटी घालण्यात आल्या होत्या, त्याचं सरार्सपणे कला केंद्रांकडून उल्लंघन होत असल्याचं पोलिसांच्या निर्दशनास आलं आहे. या प्रकरणात आता पोलिसांनी कला केंद्र चालकांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. महाकाली, पिंजरा, कालिका, गौरी आणि साई कला केंद्राच्या चालकाविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.  पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी या कला केंद्रांविरोधात कडक कारवाईचे आदेश दिले होते, त्यानंतर आता पोलिसांकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.