गेल्या अनेक वर्षांपासून भारतातील प्राणी संरक्षण कार्यकर्ते एका हत्तीचं पुनर्वसन करण्याचा प्रयत्न करत होते. परंतु, हे कार्यकर्ते सध्या दुःखात आहेत. कारण ज्या हत्तीसाठी त्यांचा सर्व आटापिटा सुरू होता, त्या हत्तीचा मृत्यू झाला आहे.
दिल्लीच्या प्राणिसंग्रहालयातील शंकर हा एकमेव आफ्रिकन हत्ती, ज्यानं आपलं आयुष्य एकटेपणात घालवलं, बुधवारी (17 सप्टेंबर) तो अन्न खायलाही तयार झाला नाही आणि सायंकाळी तो अचानक कोसळला. डॉक्टरांनी प्रयत्न केले, पण 29 वर्षांचा हा हत्ती अवघ्या 40 मिनिटांत मरण पावला, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं.
24 वर्षे शंकर एकटेपणात जगला. त्यापैकी किमान 13 वर्षे तर त्यानं पूर्णपणे एकांतवासात घालवले.
त्याच्या मृत्यूचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. "मृत्यूचं कारण शोधण्यासाठी चौकशीचे आदेश दिले आहेत," असं प्राणिसंग्रहालयाचे संचालक संजीत कुमार यांनी बीबीसीला सांगितलं.
झिम्बाब्वेने भेट म्हणून दिले होते हत्तीशंकर हा दोन आफ्रिकन हत्तींमधील एक होता, जो 1998 साली झिम्बाब्वेकडून भारतात आणला गेला होता. तो त्या वेळी भारताचे माजी राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा यांना भेट म्हणून दिला गेला होता.
परंतु, शंकरच्या साथीदाराचा 2001 साली मृत्यू झाला, असं संजीत कुमार यांनी सांगितलं.
एका माजी प्राणिसंग्रहालय अधिकाऱ्याने नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर सांगितलं की, शंकरच्या साथीदाराचा मृत्यू झाल्यानंतर त्याला तात्पुरत्यारीत्या प्राणिसंग्रहालयातील आशियाई हत्तींसोबत ठेवण्यात आलं, पण हा प्रयत्न यशस्वी झाला नाही.
"ते एकमेकांबद्दल खूप आक्रमक होते," असं त्यांनी सांगितलं आणि नंतर शंकरला लवकरच वेगळं ठेवण्यात आलं.
"शंकर आपल्या साथीदारासोबत असताना खूप खेळकर होता. ते दोघे प्राणिसंग्रहालयातील पाहुण्यांमध्ये लोकप्रिय होते. पण दुसऱ्या आफ्रिकन हत्तीच्या मृत्यूनंतर शंकरचं वर्तन बदललं.
शंकरला कोणी स्वीकारलंच नाहीशंकरने कधीही इतर हत्तींची सोबत स्वीकारली नाही, आणि इतर हत्तींणीही त्याला स्वीकारलं नाही. तो पूर्णपणे बिना साथीदाराविना राहिला," असं ते माजी अधिकारी म्हणाले.
2012 मध्ये शंकरला एका नवीन पिंजऱ्यात ठेवण्यात आलं, जिथे तो जवळजवळ एकटाच राहिला. 2009 मध्ये लागू झालेल्या नियमाचं उल्लंघन झालं, ज्यात म्हटलं होतं की, हत्तीला सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ एकटं ठेवता येणार नाही. मरेपर्यंत तो तिथेच राहिला.
काही वर्षांपासून कार्यकर्ते शंकरला प्राणिसंग्रहालयातून काढून इतर आफ्रिकन हत्तींसोबत वन्यजीव अभयारण्यात पुनर्वसन करण्याची मागणी करत होते.
2021 मध्ये दिल्ली उच्च न्यायालयात शंकरला इतर आफ्रिकन हत्तींसोबत असलेल्या अभयारण्यात स्थलांतरित करण्यासाठी याचिका दाखल करण्यात आली होती.
दोन वर्षांनंतर, न्यायालयाने ही याचिका नाकारली आणि याचिकाकर्त्याला प्राणिसंग्रहालयांमधून प्राणी हस्तांतरणाचे काम पाहणाऱ्या समितीकडे जाण्याचा सल्ला दिला.
शंकरचं वय कमी अन् अचानक मृत्यूबुधवारपर्यंत शंकर हा भारतातील प्राणिसंग्रहालयांतील फक्त दोन आफ्रिकन हत्तींपैकी एक होता. दुसरा हत्ती, जो प्रौढ नर आहे. तो कर्नाटकच्या म्हैसूरु प्राणिसंग्रहालयात असतो.
प्राणिसंग्रहालयांना या दोन आफ्रिकन नर हत्तींसाठी जोडीदार शोधण्यासाठी खूप अडचणी आल्या. खर्च जास्त, नियम कठीण, अनेक परवानग्या लागतात आणि प्राण्यांच्या भल्याबद्दल चिंताही असते, असं 'इंडियन एक्सप्रेस'नं सांगितलं.
कार्यकर्त्यांनी दिल्लीच्या प्राणिसंग्रहालयात शंकरला ज्याठिकाणी ठेवलं होतं, त्या परिस्थितीवरही टीका केली आहे. त्यांनी त्याचा पिंजरा उदास, अंधकारमय आणि अपुरा असल्याचं सांगितलं.
"त्याला अशा प्रकारे मरताना पाहून मन खूप दुःखी झालं आहे," असं 2021 मध्ये याचिका दाखल केलेल्या 'युथ फॉर अॅनिमल्स'च्या संस्थापक निकिता धवन यांनी सांगितलं.
"हा मृत्यू सहज टाळता येऊ शकला असता. शंकरला कोणताही गंभीर आजार नव्हता. आणि तो अजून खूप लहान होता."
आफ्रिकन हत्तीचं सरासरी वय हे 70 वर्षे इतकं असतं.
दिल्ली प्राणिसंग्रहालयाचे संचालक कुमार म्हणाले की, बुधवारी (17 सप्टेंबर) सकाळपर्यंत शंकरच्या बाबतीत "काही आजार किंवा असामान्य वर्तन नोंदवले गेलेलं नाही."
यंत्रणेचं अपयश, जबाबदारी कोणाची?प्राणी कल्याण कार्यकर्त्या गौरी मौलेखी म्हणाल्या की, शंकरच्या मृत्यूमागे "संस्थात्मक उदासीनता आणि अनेक वर्षांपासूनचे दुर्लक्ष" कारणीभूत आहे आणि हे एका यंत्रणेचं अपयश आहे, ज्याची जबाबदारी घेतलीच पाहिजे.
"फक्त अंतर्गत चौकशीने काम होणार नाही," असं मौलेखी यांनी बीबीसीला सांगितलं.
"हे एका यंत्रणेचं अपयश आहे, ज्याची खरी जबाबदारी घ्यायला हवी. हा एक असा क्षण असावा, ज्यामुळे हत्ती आणि इतर सामाजिक प्राणी प्राणिसंग्रहालयांमध्ये एकटं ठेवण्याची क्रूर पद्धत संपेल."
उदासीनतेच्या आरोपांबाबत विचारलं असता, कुमार म्हणाले की "सर्व काळजी आणि देखभाल घेतली गेली," पण त्यांनी विशिष्ट प्रश्नांची उत्तरं देण्यास मात्र नकार दिला.
ऑक्टोबर 2024 मध्ये, वर्ल्ड असोसिएशन ऑफ झूज अँड अक्वेरियम्सने शंकरच्या राहण्याच्या परिस्थितीबाबत चिंता व्यक्त करून दिल्ली प्राणिसंग्रहालयाचे सदस्यत्व निलंबित केलं. कारण त्याला साखळीने बांधलं गेलं होतं, असं वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेनं दिलं होतं.
जोडीदार मिळण्याआधीच मृत्यूनं गाठलंजागतिक संस्थेने दिल्ली प्राणिसंग्रहालयाला एप्रिल 2025 पर्यंत शंकरचं स्थलांतरण करणं किंवा त्याच्या काळजीमध्ये सुधारणा करण्यासाठी वेळ दिला होता आणि इशारा दिला होता की जर ही वेळ पाळली नाही तर सदस्यत्व रद्द केलं जाईल.
निलंबनाच्या नोटिशीनंतरच्या दिवशी, एक केंद्रीय मंत्री शंकरचा पिंजरा पाहण्यासाठी गेले आणि त्यांनी शंकरची प्रकृती बरी असल्याचं सांगितलं.
15 ऑक्टोबरला सरकारने जाहीर केलं की, शंकरसाठी एक मादी साथीदार आणण्याची योजना आहे. झिम्बाब्वे आणि बोत्सवाना यांनी यात रस दाखवला आहे आणि अधिकृत प्रक्रिया सुरू आहे.
दिल्ली प्राणिसंग्रहालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, त्यांना जागतिक संस्थेकडून नंतर काही नोटीस मिळाली नाही आणि शंकरच्या साथीदाराची व्यवस्था होण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)