जगण्यातलं उबदार सौंदर्य
esakal September 21, 2025 08:45 PM

अक्षय शेलार - shelar.abs@gmail.com

मृत्यूची जाणीव ही जीवन अधिक प्रखरपणे जगायला शिकवते, हे फ्लॅनगन अत्यंत सहज सांगतो. ‘द लाइफ ऑफ चक’ हा सिनेमा पाहताना आपल्याला स्वतःच्या आयुष्याची आठवण येते. आपण अनुभवलेले क्षण, विसरलेली नाती आणि कधीच परत न मिळणारा काळ हे सगळं एकदम डोळ्यांसमोर उभं राहतं.

माईक फ्लॅनगन हे नाव घेताक्षणीच भयपट, अलौकिक थरार, भुताटकीच्या प्रतिमा आणि मृत्यूच्या सावल्यांत फिरणाऱ्या पात्रांची आठवण होते. ‘द हॉन्टिंग ऑफ द हिल हाऊस’ मालिकेपासून ते ‘डॉक्टर स्लीप’ किंवा ‘मिडनाईट मास’पर्यंत फ्लॅनगनने दृक्-श्राव्य कलाकृतींच्या माध्यमातून भीतीला एका तत्त्वज्ञानात्मक गूढतेत रूपांतरित केलं आहे; मात्र ‘द लाईफ ऑफ चक’ हा त्याचा नवा चित्रपट एकदम वेगळा आहे. इथे ना हाडं गोठवणारा अंधार आहे, ना कुठल्याही भुताचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष धाक. उलट इथे मनुष्य जीवनाचा आणि स्मृतींचा उत्सव आहे. इतका की, मृत्यूकडे नेणारा प्रवास इतक्या शांत, प्रेमळ आणि सकारात्मक पद्धतीनं दाखवणं हे फ्लॅनगनच्या शैलीतलं एक मोठं वळण ठरावं.

हा चित्रपट स्टीव्हन किंगच्या एका लघुकथेवर आधारलेला आहे. तीन प्रकरणांत विभागलेलं कथानक चक क्रॅन्ली (टॉम हिडलस्टन) या पात्राच्या जीवनप्रवासाभोवती फिरतं. त्याचा हा प्रवास उलटरीत्या मांडला जातो. पहिल्या प्रकरणात एका गूढ पद्धतीने जाहिराती, होर्डिंग आणि टीव्हीवर चक नावाचं अस्तित्व दिसू लागतं, जणू जग त्याचं अखेरचं स्मरण करत आहे. दुसऱ्या प्रकरणात त्याच्या लहानपणीचं घरचं, कौटुंबिक नात्यांचं, सुख-दुःखांचं चित्र उमटतं. तर शेवटच्या प्रकरणात चक बाल्यावस्थेतील अनुभवातून स्मृतींच्या शुद्ध, नितळ आनंदाकडे परततो. ही रचना अगदीच नवीन आहे असंही नाही; मात्र फ्लॅनगन त्याद्वारे एका सुंदर सामंजस्याकडे नेतो.

या सिनेमाचं सर्वांत मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्याची उबदार वृत्ती. मृत्यू नामक सार्वत्रिक वास्तवाकडे बोट दाखवत असतानाही सिनेमा भीती न निर्माण करता मृत्यू उबदारपणे स्वीकारायला शिकवतो. चकच्या आयुष्याचा प्रवास मुळात प्रत्येकाच्या आयुष्याइतकाच सामान्य आहे, ज्यात तो अनपेक्षित दु:खं भोगतो, नाती गमावतो, काही क्षण जगतो आणि शेवटी सारे काही आठवणींच्या रूपात विरून जाते. फ्लॅनगन मृत्यूला एक भयावह काळोख न मानता एक परिपूर्ण वर्तुळ समजतो. म्हणूनच या सिनेमात हसणं, संगीत, कुटुंब, प्रेम आणि लहानसहान क्षणांचा गोडवा सामावलेला आहे.

अभिनयाच्या दृष्टीने टॉम हिडलस्टनने साकारलेला चक हा विलक्षण आहे. त्याच्या चेहऱ्यावरचं प्रसन्न हास्य आणि डोळ्यांत दडलेली अंतर्मुख शांतता या दोन्ही गोष्टी एकत्र दिसतात. मार्क हॅमिलसारख्या अभिनेत्याची उपस्थिती सिनेमाला एक वेगळं वजन देते; पण इथे स्टारकास्टपेक्षा महत्त्वाचं आहे ते फ्लॅनगनचं दिग्दर्शन. त्याने प्रत्येक दृश्याला साधेपणा मिळवून दिला आहे. कुठल्याही नाट्यमयतेचा अतिरेक नाही, ना कुठली भडक तंत्रकला. उलट सौम्य प्रकाशयोजना, हळुवार संवाद आणि स्मरणातल्या प्रतिमा या सगळ्यांतून सिनेमा उलगडतो.

कथानकाच्या पृष्ठभागावर दिसणाऱ्या गोष्टींपलीकडे खोलात पाहिलं, तर इथे काही गंभीर सूत्रं आढळतात. एक म्हणजे स्मृती आणि विस्मरण. माणूस खरंच कधी मरतो? श्वास थांबल्यावर, की लोक त्याला विसरल्यावर? (‘कोको’ हा सिनेमा आठवून पाहा.) पहिल्या प्रकरणातील बिलबोर्ड्स आणि जाहिरातींमधून उगम पावणारी चकची छबी ही या प्रश्नाला भिडते. दुसरं म्हणजे बालपणाचं नितळ सौंदर्य. शेवटच्या प्रकरणात चक पुन्हा बाल्यावस्थेकडे परततो, जणू मृत्यू म्हणजे एका सुरक्षित जागेतला पुनर्जन्म आहे. तिसरं सूत्र म्हणजे सामान्य आयुष्याची महत्ता. चक कुठला मोठा नायक नाही, ना त्याच्या आयुष्यात भव्य कामगिरी आहे; पण त्याचं जगणं त्याच्या जवळच्या लोकांसाठी तेवढंच महत्त्वाचं आहे.

या सगळ्यांतून सिनेमा मृत्यूवर नाही, तर जीवनावर भर देतो. मृत्यूची जाणीव ही जीवन अधिक प्रखरपणे जगायला शिकवते, हे फ्लॅनगन अत्यंत सहज सांगतो. ‘द लाईफ ऑफ चक’ हा सिनेमा पाहताना आपल्याला स्वतःच्या आयुष्याची आठवण येते. आपण अनुभवलेले क्षण, विसरलेली नाती आणि कधीच परत न मिळणारा काळ हे सगळं एकदम डोळ्यांसमोर उभं राहतं. फ्लॅनगनचा हा प्रयत्न सिनेमाच्या भाषेतून एक भावनिक तत्त्वज्ञान मांडण्याचा आहे. मृत्यूभोवती फिरणारे कित्येक चित्रपट किंवा साहित्यकृती शोकाकुल करतात; पण ‘द लाईफ ऑफ चक’ आपल्याला एका गोड शांततेच्या दिशेने नेतो. जणू एखादा मऊ, उबदार हात खांद्यावर आहे नि म्हणतोय, की ‘‘सगळं काही ठीक आहे, हाही जगण्याचाच भाग आहे.’’

या चित्रपटाची गती संथ आहे, प्रसंगही साधे आहेत; पण म्हणून हा सिनेमा अतिभावनिक किंवा गूढ नाही. फ्लॅनगनच्या कथनपद्धतीत जी प्रामाणिकता आहे, ती या साधेपणाला सार्थ ठरवते. इथे भयाचा अतिरेक नाही, उलट प्रत्येक क्षणात आयुष्याची सौंदर्यदृष्टी आहे. मृत्यूची वाढती आकडेवारी, आपत्ती आणि धाक या स्वरूपात समोर येणाऱ्या आजच्या काळात अशा प्रकारचं चित्रण फार महत्त्वाचं ठरतं. ‘द लाईफ ऑफ चक’ आपल्याला आठवण करून देतो, की अखेरीस नाती, स्मृती आणि आपण जगलेले क्षण हेच काय ते महत्त्वाचं आहे. मृत्यू म्हणजे एका (जीवन)कथेला पूर्णविराम देणं; पण त्या कथेतल्या प्रत्येक वाक्याला त्याचं असं स्वतःचं सौंदर्य असतं.

अखेरीस, ‘द लाईफ ऑफ चक’ हा सिनेमा म्हणजे भयपट दिग्दर्शकाच्या हातून घडलेली, जीवनाविषयीची एक सौम्य, आश्वासक रचना आहे. या रचनेत माणूस केवळ मरत नाही, तर आपल्या आठवणींमध्ये, आपल्या प्रियजनांच्या मनात कायमच जिवंत राहतो. फ्लॅनगनने केलेलं हे चित्रण जीवनाच्या गाभ्याशी भिडतं आणि म्हणूनच हा सिनेमा त्याच्या कारकिर्दीतला एक अनोखा, अविस्मरणीय टप्पा ठरतो. ‘द लाईफ ऑफ चक’ ॲपल टीव्ही आणि ॲमेझॉन प्राइम व्हिडिओवर पाहता येईल.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.