भारतीय क्रिकेटपटूंचा 'सर्जिकल स्ट्राइक'
esakal September 21, 2025 05:45 PM

शैलेश नागवेकर-shailesh.nagvekar@esakal.com

पहलगाममध्ये २२ एप्रिल २०२५ रोजी झालेल्या जखमा आणि वेदना कोणीच विसरू शकत नाही. त्या भरूनही येऊ शकत नाही. पहलगाममध्ये निष्पाप २६ पर्यटकांना पाकिस्तानी दहशदवाद्यांकडून मारण्यात आले. त्यानंतर प्रत्येक भारतीयाच्या संतापाचा पारा चढलेलाच आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ने पाकिस्तानला भारताची ताकद दाखवण्यात आली, तरीही संतापाचे निखारे पेटतच आहेत.

याचे पडसाद पाकबरोबरच्या सर्वच स्तरावरील संबंधांवर उमटलेले आहेत. राजनैतिक संबंधांनंतर सर्वात चर्चेत असतात ते क्रिकेट संबंध. त्यात ऑगस्ट महिन्यात झालेल्या निवृत्त खेळाडूंच्या लिजेंटस लीग स्पर्धेत जेथे युवराज सिंग आणि हरभजन सिंगसारखे खेळाडू खेळत असलेल्या भारतीय संघाने पाकिस्तानबरोबरची लढत खेळण्यास नकार दिला आणि तेथून दिशा आणि विचारही बदलत गेले. दुबईत होत असलेल्या आशिया करंडक स्पर्धेसाठी भारत-पाक सामन्याबाबत तेथूनच वातावरण तयार होत होते. अमिरातीमध्ये होत असलेली ही स्पर्धा जसजशी जवळ येत होती, तसतसे पाकिस्तानविरुद्ध खेळूच नका, असे वातावरण तयार झाले. पाकिस्तानविरुद्ध द्विपक्षीय मालिकांमध्ये खेळण्यावर कधीपासूनच बंदी आहे; परंतु आयसीसी आणि आशियाई क्रिकेट परिषदेच्या बहुराष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळायला हरकत नाही, अशी भूमिका सरकारने जाहीर केली. तरीही सिंदूर आणि क्रिकेट यांची सांगड घालणे अनेकांना पटत नव्हते.

Latest Marathi News Updates : दिवसभरात देश विदेशात काय घडलं जाणून घ्या एका क्लिकवर

अशा विरोधाच्या वातावरणात भारतीय संघ अमिरातीमध्ये पोहोचला; पण विरोध कायम होता. त्यातच स्पर्धेच्या करंडक अनावरणाच्या कार्यक्रमाअगोदर भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने आशिया क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष असलेल्या मोहसिन नक्वी यांच्याशी औपचारिकता म्हणून हस्तांदोलन केले. हा समारंभ झाल्यावर डायसवरून खाली उतरताना सूर्यकुमार पाक कर्णधार सलमान आघा याच्याशीही हात मिळवताना दिसून आला. या दोन घटना सामान्य भारतीयांचा विरोध अधिक तीव्र होण्यास पुरेसा ठरला. समाजमाध्यवांवर तर मोठ्या प्रमाणात टीका होऊ लागली होती. याची दखल अमिरातीमधील भारतीय संघ आणि येथे बीसीसीआयचे पदाधिकारी घेणार हे निश्चित होते; पण नेमकी काय भूमिका घेतली जाणार, याचा ठावठिकाणा लागत नव्हता. स्पर्धेतून अचानक माघार तर शक्य नव्हती, कारण स्पर्धा अमिरातीमध्ये होत असली तरी यजमान बीसीसीआय आहे म्हणजे भरलेल्या मांडवातून यजमानच कसे बाहेर पडणार?

अखेर सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या गेल्या रविवारच्या पाकविरुद्धच्या सामन्यात पहिला ‘सर्जिकल स्ट्राईक’ झाला तो नाणेफेकीच्या वेळी सूर्यकुमारने सलमान आघाशी हस्तांदोलन टाळले. इतकेच काय तर आपल्या अंतिम ११ खेळाडूंची नावे असलेला कागद त्याने आघाकडे न देता थेट सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट यांच्याकडे दिला. भारतीयांची ही कृती पुढे काय होणार याची नांदी होती, तरीही पाकिस्तानी खेळाडू सामना संपल्यानंतर हस्तांदोलनासाठी मैदानात उभे राहिले होते.

सूर्यकुमार यादव आणि त्याची संघाची ही एक कृती भारत आणि पाकिस्तान यांच्यातील पुढील किमान क्रिकेट संबंधांना वेगळ्या वळणावर नेणारी ठरणार आहे. मुळात भारतीयांनी जखमेवर मीठ चोळल्यानंतर थयथयाट करणाऱ्या पाकिस्तानने पायक्रॉफ्ट यांना बळीचा बकरा करण्याचा प्रयत्न केला आणि तक्रार जय शहा अध्यक्ष असलेल्या आयसीसीकडे केली. अपेक्षेप्रमाणे त्यांच्या तक्रारीला केराची टोपली दाखवण्यात आली. मुळात क्रिकेटच्या पुस्तकात कोठेही हस्तांदोलनाचा नियम नाही. तरीही आमच्या सामन्यातून पायक्रॉफ्ट यांना हटवा अन्यथा आम्ही माघार घेऊ... इत्यादी वल्गना केल्यानंतर ‘अगं अगं म्हशी मला कोठे नेशी...’ असे म्हणत नाक मुठीत धरून हाच पाकचा संघ अमिरातीविरुद्ध खेळण्यास तयार झाला. मुळात सामन्याला त्यांनी उशीर केला यावरून त्यांच्यावर कारवाई करायला हवी होती. कारण अशाप्रकारे स्वतःच्या हट्टापायी सामन्याला उशीर करता येत नाही. पाऊस, वादळ किंवा अन्य नैसर्गित परिस्थितीत सामना उशिरा सुर होऊ शकतो. ही स्पर्धा संपल्यानंतर आयसीसीने पाक संघावर सामन्यास उशीर केल्याबद्दल कारवाई जरूर करावी आणि त्यांना धडा शिकवावा.

आता या सर्व घटना घडून गेल्या आहेत. पुन्हा आज सुपर-४ मध्ये भारत-पाक सामना होत आहे. भारतीय संघ आता मागे वळून पाहणार नाही; पुन्हा हस्तांदोलन केले जाणार नाहीच. भारतीय संघाला प्रत्युत्तर देण्यासाठी पाकिस्तान संघ आणि त्यांचे व्यवस्थापन कोणता तरी वेगळा प्रयत्न करू शकतात. या सामन्यासाठी अँडी पायक्रॉफ्ट पुन्हा सामनाधिकारी असणार का, हे पाहणे तेवढेच महत्त्वाचे ठरणार आहे. समजा वेस्ट इंडीजचे रिची रिचर्डसन आजच्या सामन्यासाठी सामनाधिकारी म्हणून नियुक्त झाले तर त्यांची भूमिका काय असणार, याचीही उत्सुकता असेल.

आता याच महिन्याच्या शेवटी भारतात महिलांची विश्वकरंडक स्पर्धा सुरू होत आहे. त्यातील भारत-पाक लढत कोलंबो येथे नियोजित आहे. तेथेही भारतीय महिला सिंदूरची किंमत दाखवणार, हे सिंदूरच्या लाल रंगाएवढेच गडद आहे. त्यानंतर पुढील वर्षी भारतात ट्वेन्टी-२० विश्वकरंडक होणार आहे. यातील भारत-पाक लढतही श्रीलंकेत होईल; पण तिथेही हीच प्रथा कायम राहिली, किंबहुना आता पाक संघाशी किंवा खेळाडूंशी ‘ना हस्तांदोलन पॉलिसी’ तयार झाली आहे आणि त्यात पुढील अनेक वर्षांमध्ये खंड पडेल, असे वाटत नाही.

या पार्श्वभूमीवर सर्वात मोठा प्रश्न कदाचित ऑलिंपिकमध्ये उद्भवू शकतो. तीन वर्षांनंतर लॉस एंजेलिस ऑलिंपिक होत आहे. ऑलिंपिकमध्ये पुन्हा एकदा क्रिकेटला स्थान देण्यात आले आहे. मुळात त्यासाठी पाकिस्तान संघ पात्र ठरायला हवा. सध्याच्या नियमानुसार ट्वेन्टी-२० मधील पहिले सहा संघ ऑलिंपिकसाठी पात्र ठरणार आहेत आणि पाकिस्तानची क्रमवारी त्याच्याही पुढे आहे. त्यामुळे ते पात्रच ठरले नाही तर सुंठीवाचून खोकला गेल्यासारखे असेल.

२०३०च्या राष्ट्रकुल आणि २०३६च्या ऑलिंपिक स्पर्धेचे यजमानपद मिळवण्यासाठी भारत प्रयत्न करीत आहे. यजमानपद मिळवण्यासाठी अनेक गोष्टी संबंधित असतात. याचाच फायदा घेऊन पाकिस्तान त्यात वेगळ्या मार्गाने खोडा टाकू शकतो, यासाठी भारतीयांना सावध राहावे लागेल; पण हा पुढचा भाग आहे. तोपर्यंत तरी अमिरातीमध्ये भारतीय क्रिकेटपटूंनी केलेला सर्जिकल स्ट्राईक पाक क्रिकेटची दैना करणारा आहे, हे निश्चित.

क्रिकेट द्वंद्व ऐरणीवर

दुबईत होत असलेल्या आशिया करंडक स्पर्धेत सूर्यकुमार यादव आणि संघाची एक कृती भारत आणि पाकिस्तान यांच्यातील पुढील क्रिकेट संबंधांना वेगळ्या वळणावर नेणारी ठरणार आहे. मुळात भारतीयांनी जखमेवर मीठ चोळल्यानंतर थयथयाट करणाऱ्या पाकिस्तानने पायक्रॉफ्ट यांना बळीचा बकरा करण्याचा प्रयत्न केला. आयसीसीकडे तक्रार केली. अपेक्षेप्रमाणे त्यांच्या तक्रारीला केराची टोपली दाखवण्यात आली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.