वाकड, ता. २० : थेरगावमधील डांगे चौकातील दत्त मंदिर रस्त्याकडे जाणाऱ्या वाकड फाट्यावर पथारी व्यावसायिकांनी अतिक्रमण करून पदपथांसह मुख्य रस्त्यावर कब्जा केला आहे. हे व्यावसायिक दिवसागणिक मालामाल होत असताना करदात्या रहिवाशांना दैनंदिन जीवनात हाल सहन करावे लागत आहेत. पदपथावर व्यावसायिक बसत असल्याने मला रस्त्यावरून चालावे लागते. माझा कधीही अपघात होऊ शकतो, अशी धक्कादायक व्यथा ज्येष्ठ नागरिक व्यक्त करत आहेत.
वाकड फाटा प्रचंड वर्दळीचा चौक आहे. रोज हजारो वाहने आणि पादचारी तेथून येत-जात असतात. मात्र, गेल्या काही वर्षांपासून या परिसरातील पदपथांवर पथारी व्यावसायिकांनी अतिक्रमण केले आहे. फळे, भाज्या, चहा-नाश्ता, कपडे आणि इतर छोट्या-मोठ्या वस्तू विकणारे हे व्यावसायिक पदपथाचा मोठा भाग व्यापून बसले आहेत. त्यामुळे पादचाऱ्यांसाठी चालण्याची जागा उरलेली नाही. या अतिक्रमणांचा सर्वाधिक फटका महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना बसत आहे. पदपथ अडकले असल्याने त्यांना मुख्य रस्त्यावरून चालावे लागते. तेथे वाहने वेगाने धावत असतात.
आम्ही कर भरतो, तरीही...
- महापालिका अतिक्रमण विभाग, पोलिसांचेही समस्येकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे परिसरातील त्रस्त रहिवासी त्यातून सुटका करण्याची मागणी करत आहेत. आम्ही नियमित कर भरतो; पण पदपथ वापरणे शक्य होत नाही. त्यामुळे आम्हाला धोकादायकपणे रस्त्यावरून चालावे लागते, असे रहिवाशांचे म्हणणे आहे.
काय आहे समस्या ?
- पथारी व्यावसयिकांचे वाढते अतिक्रमण
- रिक्षा थांबे, बेकायदा पार्किंग, बेशिस्तपणे वाहने उभी
- दररोज वाहतूक कोंडी, चालक त्रस्त
- रहिवाशांना पदपथावरून चालणे कठीण
- तळीरामांचा दिवसभर वावर, टोळक्याने धांगडधिंगा
- महिला आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये असुरक्षेची भावना
महिला असुरक्षित
महिलांसाठी ही परिस्थिती आणखी असुरक्षित झाली आहे. संध्याकाळी आणि रात्रीच्यावेळी पदपथावर गर्दी असल्याने चोरटे आणि असामाजिक तत्वांचा धोका वाढला आहे. महिलांना एकटे चालणे कठीण झाले आहे. व्यावसायिकांच्या गर्दीतून जाताना धक्काबुक्की होते आणि सुरक्षित वाटत नाही, असे एका महिलेने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.
‘‘मी ६५ वर्षांची आहे. पदपथावर व्यावसायिक बसले असल्याने मी रस्त्यावरून चालते. माझा कधीही अपघात होऊ शकतो.’’
- लक्ष्मी जोशी, ज्येष्ठ नागरिक
आम्ही नियमित कारवाई करतो. अनेक वेळा अतिक्रमण कारवाईची मोहीम राबवली जाते. त्यात अनेक व्यावसायिकांना हटवण्यात येते. पण ते पुन्हा व्यवसाय थाटतात. पदपथ हे पादचाऱ्यांसाठी आहेत. व्यावसायिकांसाठी नाही. बीआरटी मार्गातील मोकळ्या जागा सशुल्क पार्किंगसाठी मिळाव्यात यासाठी आम्ही बीआरटीशी पत्रव्यवहार केला आहे. अतिक्रमणांवर कठोर कारवाई करू.
- किशोर ननावरे, क्षेत्रीय अधिकारी, ‘ग’ कार्यालय
WKD25A09519, WKD25A09520