चिखली : चिखलीतील मोरे वस्ती परिसरामध्ये अंतर्गत आणि मुख्य रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहन चालक आणि नागरिक त्रस्त झाले आहेत. पावसाने उघडीप दिल्यानंतर रस्त्यावरील खड्ड्यांची दुरुस्ती केली जाईल, असे महापालिकेच्या स्थापत्य विभागाकडून वारंवार सांगितले जात होते.
आता पाऊस उघडला असून रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे काम हाती कधी घेणार ? असा सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे. चिखली परिसरातील अंतर्गत तसेच मुख्य रस्त्यांची अक्षरशः चाळण झालेली पाहावयास मिळत आहे.
अनेक अंतर्गत रस्त्यांवर तर गेल्या पाच वर्षांत एकदाही डांबरीकरण करण्यात आलेले नाही. त्यातच सांडपाणी वाहिन्या, पावसाळी गटारे, विजेची केबल टाकणे यासारख्या कामांसाठी वारंवार रस्त्यांची खोदाई करण्यात आली. यावर्षी सतत सुरू असलेला पाऊस यामुळे एकही रस्ता खड्डा विरहित असलेला पाहावयास मिळत नाही.
रस्ता दुरुस्तीबाबत लाखो रुपयांच्या निविदा काढल्या जातात. मात्र, रस्त्यावर खडी शिंपडण्या व्यतिरिक्त दुसरे कोणतेही काम महापालिकेकडून केले जात नाही. खड्ड्यांमुळे अपघात ही दररोजची बाब होऊन बसली असून वाहन चालवताना कंबर आणि पाठीला मोठा त्रास होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
विकासकामांसाठी महापालिकेने, महावितरण तसेच नागरिकांनी रस्त्यांची खोदाई केली आहे. मात्र, त्यावरील खड्डे अद्यापही बुजविलेले नाहीत. वाहन चालविताना कंबर आणि पाठ अक्षरशः ठेचून निघत आहे. याबाबत महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना वारंवार सांगूनही रस्ता दुरुस्त करण्याची तसदी घेतली जात नाही.
- बाळासाहेब मोरे,
शहरातील रस्त्यांची सोशल मीडियावर खिल्ली सामाजिक कार्यकर्ते, चिखलीपिंपरी-चिंचवड महापालिकेकडून रस्ता दुरुस्तीसाठी निविदा काढल्या जातात. त्यांची बिलेही वेळेवर दिली जातात. रस्ता दुरुस्त झालेला मात्र दिसत नाही. महापालिका प्रशासनाकडून फक्त भ्रष्टाचार आणि करदात्यांच्या पैशाची उधळपट्टी सुरू आहे.
- किशोर तेलंग, माहिती अधिकारी कार्यकर्ते, चिखली