भारत आणि पाकिस्तान आज पुन्हा समोरासमोर, 'नो हँडशेक'वर माजी क्रिकेटपटूंना काय वाटतं?
BBC Marathi September 22, 2025 05:45 AM
Getty Images आशिया कपच्या सुपर-4 चा दुसरा सामना रविवारी (21 सप्टेंबर) भारत आणि पाकिस्तानमध्ये दुबईत खेळला जाणार आहे

भारताचं क्रिकेट वेड प्रचंड आहे. मात्र हा खेळही राजकारणापासून अलिप्त राहिलेला नाही. तुम्हाला क्रिकेटमध्ये रस नसला तरीदेखील आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्याशी निगडीत वादाबद्दल वृत्तपत्र, टीव्ही आणि सोशल मीडियावर आलेल्या बातम्या, माहितीनं तुमचं लक्ष नक्कीच वेधून घेतलं असेल.

आज (21 सप्टेंबर) सुपर-4 च्या लढतीसाठी भारत आणि पाकिस्तानचे संघ पुन्हा एकदा एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत.

पण 14 सप्टेंबरला भारत-पाकिस्तानमध्ये दुबईत झालेल्या क्रिकेट सामन्यात भारतानं पाकिस्तानला 7 गडी राखून हरवलं होतं. त्या सामन्याकडे आधी जरा वळूया.

भारतीय क्रिकेट चाहत्यांनी हा विजय जल्लोषात साजरा केला. मात्र या सामन्यातून एक वाद देखील निर्माण झाला.

नाणेफेक आणि सामना संपल्यानंतर दोन्ही संघाचे खेळाडू एकमेकांशी हस्तांदोलन करतात. क्रिकेटमध्ये ही परंपराच आहे. मात्र या सामन्यात भारताच्या क्रिकेटपटूंनी पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन केलं नाही.

पाकिस्तानच्या क्रिकेट नियामक मंडळानं यावर आक्षेप घेत हे वर्तन खिलाडूवृत्तीच्या विरोधातील असल्याचं म्हटलं.

तर भारताकडून 'दहशतवादा'च्या पीडितांबरोबर असल्याचं दाखवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं आहे, असं सांगण्यात आलं. मात्र हा 'हँडशेक वाद' तेवढ्यावरच थांबला नाही.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियामक मंडळ आणि सामनाधिकारी (मॅच रेफरी) यांच्या भूमिकेवर देखील प्रश्न उपस्थित झाले. त्यांनी ही परिस्थिती योग्यप्रकारे हाताळली का, असं विचारलं जाऊ लागलं.

या घटनेनंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले. जे घडलं, तसं घडायला नको होतं का? राजकीय वादांमध्ये खेळाडूंची कोंडी होते का? की देशभावनेबरोबर त्यांच्या भावनांचादेखील आदर करण्यात आला पाहिजे का?

प्रश्न असाही आहे की, क्रिकेटमध्ये प्रायोजक आणि पैशांचा मुद्दा खूप मोठा झाला आहे. या वादामध्ये भारतीय आणि पाकिस्तान क्रिकेट नियामक मंडळाच्या भूमिकेकडे कशाप्रकारे पाहायला हवं?

बीबीसीच्या 'द लेन्स' या कार्यक्रमात कलेक्टिव्ह न्यूजरुमचे डायरेक्टर ऑफ जर्नलिझम, मुकेश शर्मा यांनी याच मुद्द्यांवर चर्चा केली.

या मुद्द्यांबाबत चर्चा करण्यासाठी वरिष्ठ पत्रकार प्रदीप मॅगझिन, माजी क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक विजय दहिया, वरिष्ठ पत्रकार अयाज मेमन आणि नीरू भाटिया सहभागी झाले होते.

'नो हँडशेक वाद': परंपरा की नियम?

रविवारी (14 सप्टेंबर) भारत आणि पाकिस्तानमधील सामना सुरू होण्याच्या वेळेस आणि त्यानंतर दोन्ही संघाच्या खेळाडूंनी हस्तांदोलन केलं नव्हतं.

नाणेफेकीच्या वेळीही भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव आणि पाकिस्तानचा कर्णधार सलमान आगा यांच्यात 'हस्तांदोलन' झालं नव्हतं.

यावर सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट यांनी नाणेफेकीच्या वेळेस दोन्ही संघाच्या कर्णधारांना हस्तांदोलन न करण्यास सांगितलं होतं, असा आरोप पाकिस्ताननं केला होता. त्यांनी आयसीसीकडे याची तक्रारही केली होती.

Reuters दुबईत भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या नाणेफेकीच्या वेळेस दोन्ही संघाचे कर्णधार आणि सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट (सर्वात उजवीकडे)

त्याचबरोबर पाकिस्ताननं अशी धमकीही दिली होती की, जर सामनाधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्यात आली नाही, तर ते युएईविरोधातील सामना खेळणार नाहीत.

त्यामुळेच आशिया कपमध्ये बुधवारी (17 सप्टेंबर) पाकिस्तान-युएई यांच्यातील नॉकआउट सामना उशिरानं सुरू झाला. हा सामना पाकिस्तान 41 धावांनी जिंकला.

यावर माजी क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक विजय दहिया म्हणाले, "परंपरा आणि नियम यात फरक असतो. सामनाधिकाऱ्याबद्दल बोलायचं, तर एखाद्या नियमाचं पालन झालं नाही, तर तिथे सामनाधिकाऱ्याचा संबंध येतो."

"सामना संपल्यानंतर तुम्ही हस्तांदोलन करता, हा काही नियम नाही. यापूर्वीदेखील अशाप्रकारच्या घटना झाल्या आहेत. अशा अनेक गोष्टी इतर संघांमध्ये देखील घडल्या आहेत."

विजय दहिया यांना वाटतं की, सामनाधिकाऱ्यांनी मुलाखत दिली नाही किंवा त्यांनी काहीच केलं नाही, म्हणून हा मुद्दा उपस्थित झाला.

सामनाधिकाऱ्यांची भूमिका स्पष्ट करत ते म्हणाले, "जिथं नियमांचा संबंध येतो, तिथेच सामनाधिकारी समोर येतात."

तर या मुद्द्याबाबत वरिष्ठ पत्रकार प्रदीप मॅगझिन यांना वाटतं की, भारत पाकिस्तानबरोबर सामना खेळण्यास तयार झाला, त्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे.

ते म्हणतात, "एका बाजूला तुम्ही म्हणत आहात की, तुम्ही पाकिस्तान पुरस्कृत दहशवादाशी लढा द्याल आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही क्रिकेट खेळत आहात. 'ऑपरेशन सिंदूर' नंतर क्रिकेट सामना खेळण्यास तयार होणं ही गोष्टच धक्कादायक आहे."

ते म्हणाले की, "तुम्ही एका क्रिकेट सामन्यात खेळत आहात. एकतर तुम्ही खेळायचाच नव्हता, मग प्रश्नच उपस्थित झाला नसता. मात्र तुम्ही खेळायला तयार झालात आणि त्यानंतर तुम्ही हे करायला हवं होतं का? हा मोठा प्रश्न आहे."

भारतीय खेळाडूंवर दबाव होता का?

जाणकारांना वाटतं की भारतीय क्रिकेटपटूंनी त्या सामन्यावेळी जे केलं, जे म्हटलं, त्यासाठी त्यांच्यावर दबावदेखील होता.

मात्र, त्याचबरोबर जाणकार असंही म्हणतात की, प्रत्येक माणसाच्या स्वत:च्या भावना असतात आणि तो त्या व्यक्त करू शकतो.

Getty Images हस्तांदोलन न करण्याबद्दल भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव यानं सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत म्हटलं होतं, 'काही गोष्टी खिलाडूवृत्तीपेक्षाही मोठ्या असतात'

'हँडशेक वादा'बाबत वरिष्ठ पत्रकार नीरू भाटिया यांना वाटतं की, भारत आणि पाकिस्तानमधील या वादात भारतीय संघाच्या खेळाडूंची 'कोंडी' झाली होती. ते म्हणाले की सरकारच्या सूचना होत्या की जा आणि खेळा, म्हणून ते खेळायला गेले.

नीरू भाटिया म्हणाल्या, "भारतीय खेळाडूंवर दबाव होता की त्यांनी पाकिस्तानच्या संघाबरोबर जास्त मैत्री दाखवू नये. सर्वसाधारणपणे तर स्पर्धा होतात किंवा चांगल्या वातावरणात सामने होतात, तेव्हा भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकमेकांशी हस्तांदोलन करतात आणि बोलतात देखील."

यावर वरिष्ठ पत्रकार अयाज मेमन म्हणाले की, "मला वाटतं की तुम्ही तिथे जाऊन खेळलात ही चांगली गोष्ट आहे. तुम्ही सामना जिंकलात ही खूपच चांगली गोष्ट आहे. सामन्यानंतर लगेचच तुम्ही वक्तव्यंदेखील दिलंत."

"माझ्या मते वक्तव्यं दिल्यानंतर हस्तांदोलन न करणं, हा खेळाडूंचा सर्वात जास्त अपमान आहे. कारण खेळाडूंनी काय केलं होतं? हा राजकीय वाद सुरू आहे."

"यात भारताचे खेळाडू आणि पाकिस्तानचे खेळाडू या दोघांचीही कोणतीही भूमिका नाही. जर तुम्ही हस्तांदोलन केलं असतं त्यामुळे तुमची भूमिका बदलली नसती."

पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर का उपस्थित झाले प्रश्न?

आशिया कपच्या नियोजनानुसार बुधवारी संध्याकाळी पाकिस्तानचा संध वेळेत मैदानात पोहोचू शकला नाही. त्यावेळी विविध चर्चा सुरू झाल्या. काही माध्यमांनी पाकिस्तान सामन्यावर बहिष्कार टाकणार असल्याचं वृत्त दिलं.

मात्र, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रवक्ते आमीर मीर यांनी नंतर पत्रकारांशी बोलताना म्हटलं की, बोर्ड आणि आयसीसी अधिकाऱ्यांमध्ये चर्चा सुरू असून आणि पाकिस्तान आणि यूएई यांच्यातला सामना एक तास पुढं ढकलण्यात आला आहे.

यूएई विरुद्धच्या सामन्यातील विलंब आणि पंचांबाबतचा वाद हा प्रकार पाकिस्तानचा भारताकडून झालेला पराभव आणि तो झाकण्यासाठीचा प्रयत्न होता, असं ज्येष्ठ पत्रकार नीरू भाटिया यांना वाटतं.

त्यावर ज्येष्ठ पत्रकार प्रदीप मॅगझिन म्हणाले की, भारत खेळायला तयार झाला तर पाकिस्तानही तयार झाला आहे.

"खेळादरम्यान हात न मिळवणं म्हणजे तुम्ही निषेध व्यक्त करत आहात," असं ते भारताच्या संदर्भात म्हणाले.

प्रदीप मॅगझिन यांच्या मते, "पाकिस्तानने त्यांना करायची होती ती तक्रार केली. पण, सामना उशिरा सुरू करणं माझ्या समजण्यापलिकडचं आहे.

पाकिस्तान सामन्यावर बहिष्कार टाकणार असल्याचं माध्यमांवरून तासभर उशिरानं समजलं. पण सामना एक तास उशिरा का होत आहे, हे कोणीही सांगितलं नाही."

Getty Images पीसीबीने दावा केला की अँडी पायक्रॉफ्ट यांनी माफी मागितली आहे.

"ही स्पर्धा अशा काळात होत आहे की, ते युद्धासाठी गेले आहेत की खेळायला हेच समजत नाही," असंही ते म्हणाले.

याबाबत माजी क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक विजय दहिया म्हणाले की, "बऱ्याच गोष्टी या पहिल्यांदाच घडत असतात. पण त्यानंतरही अनेक नियम तयार होत असतात. किंवा आयसीसीकडून त्यावर विचार केला जातो."

"आयसीसी किंवा एसीसीने नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांविरुद्ध काही तक्रारी असतील तर त्यांनी त्याचा विचार नक्की केला असेल. तसेच त्यांचा विचार करून, सामना अधिकारी यांची भूमिका योग्य होती, असं त्यांचं मत होतं."

"कोणी हात मिळवावे हे सांगणं, त्यांचं काम नाही. पीसीबीने मॅच रेफरी विरोधातील तक्रारीत काही बाबी जोडल्या. त्यांनी मांडलेली भूमिका अधिक ठामपणे सिद्ध करण्याचा त्यांचा प्रयत्न होता, पण प्रत्यक्षात त्याच्या उलटं झालं," असंही ते म्हणाले.

क्रिकेटला राजकारणाशी जोडलं जातंय का?

वरिष्ठ पत्रकार प्रदीप मॅगझिन यांच्या मते भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमधील सरकारे क्रिकेटचा वापर करतात.

वरिष्ठ पत्रकार नीरू भाटिया यांचं असं म्हणणं आहे की, क्रिकेटच्या तुलनेत इतर खेळांमध्ये सरकारचा इतका हस्तक्षेप नाहीये. ते सांगतात की, "क्रिकेटमध्ये पैसाही आहे आणि राजकारणीदेखील. त्यामुळेच, इथं प्रकरण थोडं गुंतागुंतीचं होऊन बसतं."

या मुद्द्यावर प्रदीप मॅगझिन यांनी म्हटलं की, "या सगळ्याचा खेळाडूंवर खूपच जास्त परिणाम होतो. कारण, एकप्रकारे तुम्ही त्यांना शांती आणि युद्ध अशा दोन्ही गोष्टींसाठी एखादं हत्यार म्हणून वापरत आहात.

शांतीसाठी, तुम्ही त्यांना मिठी मारायला सांगता आणि युद्ध करायचं असेल तर तुम्ही त्यांना थप्पड मारायला सांगता. म्हणूनच, या खेळाला राजकारणापासून वेगळं ठेवणं खूप कठीण आहे. भविष्यात कदाचित लोक एकमेकांशी खेळणंच पसंत करणार नाहीत, अशीही परिस्थिती येऊ शकते."

पुढे ते सांगतात की, "जर हा सामना पाकिस्तानने जिंकला होता आणि त्यांनी या गोष्टी बोलल्या असत्या, तर भारत कशाप्रकारे प्रतिक्रिया देता झाला असता? त्यामुळेच, हा प्रश्न भारतीय चाहत्यांनाही आपल्या डोक्यात ठेवायला हवा की, खेळाला खेळच राहू दिलं जावं. जर त्यात राजकारण आणायचं असेल तर मग हेच घडेल."

Reuters बीसीसीआयने म्हटलं होतं की हस्तांदोलन न केल्याने भारतीय कर्णधार किंवा संघाने कोणत्याही नियमांचे उल्लंघन केलेले नाही.

वरिष्ठ पत्रकार अयाज मेमन यांनी एक चिंता व्यक्त केली की, येणाऱ्या काळात आशिया चषक होईल की नाही आणि जरी झाले तरी ते कशाप्रकारचे होतील?

पुढे ते म्हणाले की, "जर तुमचा सर्वोत्तम सामना म्हणजेच भारत आणि पाकिस्तानमधील सर्वात मोठा सामनाच धोक्यात आला असेल, तर आशिया कप आयोजित करण्यात तरी काही अर्थ आहे का?"

मेमन यांनी पुढे टी-20 वर्ल्ड कपचा उल्लेख करत म्हटलं की, "याशिवाय, भारतात होऊ घातलेला जाणारा आगामी टी-20 विश्वचषक आहे. पाकिस्तानी संघ तिथंही असेल. भारत तिथे कसा वागतो आणि वातावरण कसं असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल."

त्यांनी काही माजी आणि आजी क्रिकेटर्सवर असा आरोप केला की, ते सोशल मीडियावर या वितंडवादाला आणखी खतपाणी घालत आहेत.

ते म्हणतात की, "मी सोशल मीडियावर, विशेषतः निवृत्त क्रिकेटपटूंमध्ये पाहिलं आहे की जर भारत आणि पाकिस्तानबद्दल काही चर्चा होत असेल तर ते एकतर मीठ चोळायचं काम करतात किंवा आगीत तेल तरी ओततात."

विजय दहिया म्हणतात की "क्रिकेट हा समाजाचा एक भाग आहे, समाज क्रिकेटचा भाग नाही."

त्यांना असं वाटतं की, जेव्हा कोणताही खेळाडू मैदानात उतरतो तेव्हा त्याच्या मनात फक्त एकच विचार असतो की तो मागील सामन्यापेक्षा अधिक चांगला कसा खेळू शकेल?

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

  • स्मृती मंधानाचे 50 चेंडूत विक्रमी शतक, भारताकडून सर्वात जलद शतक करणारी महिला क्रिकेटपटू
  • भारत-पाकिस्तान : जखमी सचिनचं धाडस, शोएबची माफी अन् सेहवागचा डायलॉग
  • भारत-पाकिस्तान सामन्यांचा थरारपट; 2007 चा 'तो' सामना, जेव्हा शेवटच्या बॉलवर खेळ फिरला
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.