बीसीसीआयच्या अध्यक्षपदी मिथुन मन्हास? कोण आहे आणि कसं आहे क्रिकेट करिअर जाणून घ्या
Tv9 Marathi September 22, 2025 05:45 AM

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयचं अध्यक्षपद गेल्या काही दिवसांपासून रिक्त आहे. रोजर बिन्नी यांच्या निवृत्तीनंतर या पदावर अजून तरी कोणी विराजमान झालेलं नाही. त्यामुळे या पदाचा अतिरिक्त कारभार उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांच्या खांद्यावर आहे. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी रविवारी बोर्डाच्या उच्च पदांसाठी उमेदवारांच्या नवीन पॅनेलची घोषणा केली. यावेळी त्यांनी अध्यक्षपदासाठी माजी क्रिकेटपटू मिथुन मन्हास यांनी अर्ज केल्याची माहिती दिली. त्यामुळे अध्यक्षपदी मिथुन मन्हास यांची नियुक्ती होणार हे जवळपास निश्चित मानलं जात आहे. सौरव गांगुली आणि हरभजन सिंग यापूर्वी या पदासाठी शर्यतीत होते. पण मिथुन मन्हास यांचं नाव अचानक पुढे आलं. 28 सप्टेंबर रोजी होणाऱ्या मंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेनंतरच अधिकृत घोषणा केली जाईल, असा दावा करण्यात येत आहे.

बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी विविध पदांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची यादी जाहीर करताना सांगितलं की, “उमेदवारांचं पॅनेल तयार आहे. मिथुन मन्हास यांनी अध्यक्षपदासाठी अर्ज केला आहे. मी उपाध्यक्ष, देवजीत सैकिया सचिव, प्रभतेज सिंग भाटिया संयुक्त सचिव आणि रघुराम भट्ट खजिनदार असतील. सर्वोच्च संस्थेच्या गव्हर्निंग कौन्सिलसाठी अंतिम नावांसाठी नामांकने देखील दाखल करण्यात आली आहेत. पुढील कार्यकाळासाठी एक नवीन संस्था स्थापन केली जात आहे. सर्वांना शुभेच्छा.” दरम्यान, अरुण धुमाल हे आयपीएलचे चेअरमन असतील.

🚨 THE NEW BCCI PRESIDENT. 🚨

– Mithun Manhas likely to become the new BCCI president. (Vaibhav Bhola). pic.twitter.com/wEkDKcDObN

— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra)

कोण आहेत मिथुन मन्हास?

मिथुन मन्हास हे 45 वर्षांचे असून दिल्लीसाठी देशांतर्गत क्रिकेट खेळले आहेत. तसेच प्रशिक्षक म्हणूनही कार्यभार सांभाळला आहे. अष्टपैलू खेळाडू म्हणून त्यांनी भूमिका बजावली आहे. पण त्यांना भारतीय संघाकडून खेळण्याची कधी संधी मिळाली नाही. त्यांची क्रिकेट कारकिर्द स्थानिक संघ आणि आयपीएल पुरता मर्यादीत राहिली. दिल्लीकडून खेळताना मन्हास यांनी 157 सामन्यात 9714 धावा केल्या. यात 27 शतके आणि 49 अर्धशतकांचा समावेश ठआहे. 130 लिस्ट ए सामन्यात 45.84 च्या सरासरीने 4126 दावा केल्या आहेत. 91 टी20 सामन्यात 1170 धावा केल्यात. तर तिन्ही फॉर्मेटमध्ये त्यांच्या नावावर 70 विकेट्स आहेत.

मिथुन मन्हास 55 आयपीएल सामने खेळले असून 38 सामन्यात फलंदाजी केली आहे. यात त्यांनी 514 धावा केल्या आहेत. यात एकही शतक किंवा अर्धशतक नाही. यावेळी त्यांची सर्वोत्तम खेळी ही 42 धावांची आहे. तर एकही विकेट घेता आली नाही. दिल्ली डेअरडेविल्ड संघाकडून त्यांनी 2008 मध्ये पदार्पण केलं. तर चेन्नई सुपर किंग्सकडून 2014 मध्ये शेवटचा आयपीएल सामना खेळला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.