माश्यांचे मत्स्यबीज : उपजीविकेचे साधन
विक्रमगड, ता.२० (बातमीदार) : केंद्रीय मात्स्यिकी शिक्षण संस्थान आणि आदिवासी एकता मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने बिरसायत भवन, मनोर येथे “मत्स्यपालन आणि अनुवंशिकदृष्ट्या सुधारित माश्यांचे मत्स्यबीज – एक उपजीविकेचे साधन” या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेस पालघर जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. गोड्या पाण्यातील मत्स्यपालनाबाबत प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले. तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पन्नास शेतकऱ्यांना मत्स्यबीजाचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुंबई महानगर संघचालक तथा प्रसिद्ध उद्योजक सुरेशजी भगेरिया, मात्स्यिकी शिक्षण संस्थानचे संचालक डॉ. मुकुंद गोस्वामी, डॉ. किरण रसाळ, मत्स्य विभागाचे निवृत्त उपआयुक्त वायेडा, राजकुमार सिंगला, लेलीन सिंग, आदिवासी एकता मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष संतोष जनाठे, उपाध्यक्ष दामोदर कासट, मंगेश गोंड, सुनील किरकिरा आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यशाळेत महिला शेतकऱ्यांचा देखील मोठ्या प्रमाणात सहभाग होता.