कृष्णा कदम यांना अटल भूषण पुरस्कार
esakal September 22, 2025 09:45 AM

कृष्णा कदम यांना अटल भूषण पुरस्कार
मुंबई, ता. २१ (बातमीदार) ः अटल फाउंडेशनतर्फे दिला जाणारा राष्ट्रीय अटल अवॉर्ड २०२५ आणि अटल भूषण पुरस्कार २०२५ सोहळा शुक्रवारी (ता. १९) नवी दिल्ली येथील पंतप्रधान संग्रहालयात भव्यदिव्य स्वरूपात पार पडला. या सोहळ्यात मुंबईतील कदम कृष्णा वैद्यकीय मदत कक्षाचे संस्थापक कृष्णा कदम यांना ‘अटल भूषण पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले. याबाबतची माहिती अटल फाउंडेशनच्या राष्ट्रीय अध्यक्षा अपर्णा सिंग यांनी दिली.
कृष्णा कदम यांनी २०१९ मध्ये ‘कदम कृष्णा वैद्यकीय मदत कक्ष’ या उपक्रमाची स्थापना केली. यामागील मुख्य उद्दिष्ट ग्रामीण भागातील रुग्णांना तातडीने शहरांमध्ये वैद्यकीय सेवा मिळावी हा होता. त्यांनी व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून हजारो सदस्य, डॉक्टर, नर्स, वार्ड बॉय, तसेच सामाजिक आणि राजकीय कार्यकर्ते यांना एकत्र आणले आहे. या माध्यमातून गरजू रुग्णांना वेळेवर मदत पोहोचवली जाते. त्यांच्या या उपक्रमातून दिव्यांग, मूकबधिर आणि विशेष गरजू मुलांनाही नियमित मदत केली जाते. समाजातील सर्व थरातील गरजूंसाठी सातत्याने कार्य करणाऱ्या कृष्णा कदम यांच्या वैद्यकीय सामाजिक योगदानाची दखल घेत आजवर अनेक संस्थांनी त्यांचा सत्कार केला आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.