आशिया कप 2025 स्पर्धेच्या सुपर 4 फेरीत भारताने पाकिस्तानचा 6 गडी राखून धुव्वा उडवला. यावेळी पाकिस्तानने 172 धावांचं आव्हान दिलं होतं. पण हे आव्हान रोखणं पाकिस्तानच्या गोलंदाजांना काही जमलं नाही. अभिषेक शर्मा आणि शुबमन गिल यांनी तर पहिल्या चेंडूपासून पाकिस्तानी गोलंदाजांना फोडून काढला. त्यांना कुठेच डोकं वर काढू दिलं नाही. प्रत्येक चौकार षटकारानंतर पाकिस्तानी खेळाडूंचा चेहरा बघण्यासारखा होता. भारताने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. खरं तर या सामन्यात भारताकडून चांगलं क्षेत्ररक्षण झालं नाही. त्यामुळे पाकिस्तान संघाला 171 धावांपर्यंत मजल मारता आली. साहिबजादा फरहान झेल अभिषेक शर्माकडून सुटला आणि त्याला संधी मिळाल. त्यामुळे ओपनिंगला आलेल्या साहिबजादा फरहान आणि फखर जमान या जोडीला चांगली सुरुवात मिळाली. पण तिसऱ्या षटकात हार्दिक पांड्याने स्लोअर आर्म चेंडू टाकला आणि फखर जमान फसला. संजू सॅमसनने कोणतीही चूक न करता झेल पकडला. पण या विकेटवरून पाकिस्तानचा कर्णधार सलमान आघाने प्रश्न उपस्थित केला आहे.
भारताविरुद्ध सुपर 4 फेरीत पराभूत झाल्यानंतर पाकिस्तानचा कर्णधार सलमान आघा पत्रकार परिषदेला सामोरं गेला. तेव्हा फखर जमानच्या विकेटबाबत प्रश्न विचारला गेला. तेव्हा त्याने पंचांच्या निर्णयावरच बोट ठेवलं. हार्दिक पांड्याच्या तिसऱ्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर फखर जमानच्या बॅटला चेंडू घासून विकेटकीपर संजू सॅमसनच्या हाती गेला. त्याने चूक न करता हा झेल पकडला. तसेच जोरदार अपील केली. आता हा झेल व्यवस्थित पकडला की नाही याबाबत फील्ड पंचांनी तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली. तिसऱ्या पंचांना फुटेज सर्व अँगलमधून तपासलं आणि बाद घोषित केलं. या निर्णयामुळे फखर जमान वैतागलेला दिसला. फखर जमान बाद झाल्यानंतर पाकिस्तानच्या धावगतीला खिळ लागली होती.सामन्यानंतर सलमान आघाने सांगितलं की, माझ्या मते तो चेंडू टप्पा घेत विकेटकीपरच्या हाती गेला होता. पंचांकडून चूक होऊ शकते.
पाकिस्तानचा संघ आणि रडगाणं हे एक समीकरण आहे. आता त्यात काही नवीन नाही. फखर जमानचा फॉर्म पाहता तो काही ग्रेट करेल अशी स्थिती नव्हती. तरीही पाकिस्तानकडून रडीचा डाव सुरु आहे. साखळी फेरीतही सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट यांच्यावर आक्षेप घेतला होता. पण काहीच साध्य झालं नाही. दरम्यान, फखर जमान बाद असल्याचं सर्व प्रेक्षकांनी पाहीलं आहे. हा चेंडू टप्पा खाऊन हाती गेला नव्हता. तर चेंडूचा ग्लव्ह्जमध्येच टप्पा पडला होता. त्यामुळे तिसऱ्या पंचांनी त्याला बाद दिलं होतं.