Taliban vs US: आमच्यापासून दूर राहा, अन्यथा… तालिबानचा डोनाल्ड ट्रम्प यांना थेट इशारा
GH News September 22, 2025 08:19 PM

गेल्या काही काळापासून अनेक देशांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झालेले आहे. अशातच आता जुने शत्रू अमेरिका आणि अफगाणिस्तानमधील तालिबान यांच्यातील वाद पुन्हा एकदा पेटला आहे. सध्या अफगाणिस्तानमध्ये तालिबानती सत्ता आहे. त्यांना देशाच्या कारभारात अमेरिकेचा कोणताही हस्तक्षेप नको आहे. आता अमेरिकेकडून अफगाणिस्तानातील बग्राम एअरबेस ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरु आहे, मात्र यावर संतप्त प्रतिक्रिया देताना अफगाणिस्तानने डोनाल्ड ट्रम्प यांना कडक शब्दात इशारा दिला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

बग्राम एअरबेसवर अमेरिकेची नजर

डोनाल्ड ट्रम्प यांनी अफगाणिस्तानातील बग्राम एअरबेस ताब्यात घेण्याची भाषा केली होती. यावर बोलताना तालिबानने स्पष्ट केले आहे की, देशाचे परराष्ट्र धोरण संतुलित आणि अर्थकेंद्रित आहे, आम्ही सर्व देशांशी जवळीक साधण्याचा प्रयत्न आहोत, मात्र आम्ही आमच्या भूभागाचा एक इंच तुकडाही कोणालाही देणार नाही. तसेच तालिबानने ट्रम्प यांना स्पष्टपणे सांगितले की असा प्रयत्न करण्यापूर्वी अफगाणिस्तानचा भूतकाळाचा अभ्यास करावा.

तालिबानचा अमेरिकेला थेट इशारा

तालिबानने अमेरिकेला इशारा देताना म्हटले की, ‘अफगाणिस्तानचे स्वातंत्र्य आणि प्रादेशिक अखंडता आमच्यासाठी महत्त्वाची आहे. तालिबानने म्हटले की, “जर अमेरिकेला चांगले आणि सामान्य राजनैतिक संबंध, खाणकाम, शेती इत्यादींमध्ये गुंतवणूक आणि द्विपक्षीय व्यापार हवा असेल तर त्यांचे स्वागत आहे. परंतु जर त्यांच्या काही लोभी महत्त्वाकांक्षा असतील तर त्यांनी अफगाणिस्तानच्या इतिहासाचा अभ्यास करावा. ब्रिटिश आक्रमणापासून ते अलीकडील अमेरिकन ताब्यापर्यंत काय घडलं आहे हे समजेल, त्यांना यातून शिकण्यासारखे बरेच काही आहे.”

बग्राम एअरबेस का खास आहे?

बग्राम एअरबेस हा अफगाणिस्तानमधील सर्वात मोठा एअरबेस आहे, जो परवान प्रांतात आहे. या ठिकाणावरून परवान, काबूल, कंधार आणि बामियान सारख्या प्रमुख शहरांशी थेट कनेक्टीव्हीटी आहे. हा एअरबेस सोव्हिएत युनियनने 1950 च्या दशकात बांधला होता, त्यावेळी अमेरिका आणि सोव्हिएत युनियन अफगाणिस्तानमध्ये आपला प्रभाव वाढवण्यासाठी स्पर्धा करत होते.

1979 ते 1989 या दरम्यान सोव्हिएत अफगाण यांच्यात युद्ध झाले, त्यावेळी बग्राम बेसने महत्त्वाची भूमिका बजावली होती. 1990 च्या दशकात सोव्हिएत सैन्याने माघार घेतली आणि हा बेस सोडून ते माघारी गेले. त्यानंतर बग्राम बेस तालिबान आणि नॉर्दर्न अलायन्सच्या लढाऊ सैनिकांसाठी युद्धभूमी बनले. 11 सप्टेंबर 2001 च्या हल्ल्यानंतर, अमेरिकेने तालिबान राजवट उलथवून टाकली आणि एअरबेस ताब्यात घेतला होता. पुढील 20 वर्षे या बेसचा विकास केला, मात्र अमेरिकेने अफगाणिस्तान सोडल्यानंतर हा बेस आता तालिबानच्या ताब्यात आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.