Asia Cup 2025 : टीम इंडियाची अंतिम फेरीकडे कूच, अंतिम फेरीत या संघाशी होणार लढत!
GH News September 22, 2025 08:19 PM

आशिया कप 2025 स्पर्धेची अंतिम फेरीचं गणित आता चुरशीचं होणार आहे. सुपर 4 फेरीत सर्व सामने जिंकणारा संघ अंतिम फेरी गाठणार हे निश्चित आहे. पण तीन पैकी दोन सामने जिंकणारा कोणता संघ अंतिम फेरी गाठेल असा प्रश्न आहे. सुपर 4 फेरीत आतापर्यंत दोन सामने झाले आहेत. यात भारत विरुद्ध पाकिस्तान आणि श्रीलंका विरुद्ध बांग्लादेश हे सामने पार पडले. यात भारत आणि बांगलादेशने सामना जिंकला असून पाकिस्तान श्रीलंकेला पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. सुपर 4 फेरीत भारताने पाकिस्तानचा 6 गडी राखून पराभव केला. यामुळे दोन गुण आणि नेट रनरेट चांगला असल्याने भारतीय संघ टॉपला आहे. भारताचा नेट रनरेट हा 0.689 इतका आहे. तर बांगलादेशचा संघ दुसऱ्या स्थानावर असून 2 गुण आणि 0.121 नेट रनरेट आहे. भारत आणि बांगलादेशला अंतिम फेरी गाठण्यासाठी उर्वरित दोन पैकी एक सामना जिंकणं आवश्यक आहे. त्यामुळे भारत आणि बांगलादेशमधील पुढील सामना खूप महत्त्वाचा असेल.

पाकिस्तानच्या अंतिम फेरीच्या आशा अजूनही कायम

पाकिस्तानच्या आशिया कपच्या अंतिम फेरीत पोहोचण्याच्या आशा अजूनही कायम आहेत. अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी पाकिस्तानला आता त्यांचे उर्वरित दोन्ही सामने जिंकावे लागतील. पाकिस्तानचा पुढील सुपर 4 सामना 23 सप्टेंबर रोजी श्रीलंकेविरुद्ध आहे. हा सामना अंतिम फेरीच्या शर्यतीत एका संघाला गाशा गुंडाळण्यास भाग पाडणार आहे. या सामन्यातील पराभूत संघाचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येणार आहे. त्यामुळे हा सामना स्पर्धेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी खूपच महत्त्वाचा आहे. दुसरीकडे, हा सामना जिंकणाऱ्या संघाचं स्पर्धेतील आव्हान कायम राहील पण निश्चित नाही. कारण नंतर हे प्रकरण नेट रनरेटच्या गणितात बसेल.

…जर तसं झालं तर बांग्लादेश अंतिम फेरीत

बांगलादेशने पहिल्या सुपर 4 सामन्यात श्रीलंकेला हरवून मोठा धक्का दिला. बांगलादेशचे पुढील दोन सामने भारत आणि पाकिस्तानविरुद्ध आहेत. भारत आणि बांग्लादेश यांच्यात दुसरा सामना 24 सप्टेंबरला होत आहे. या सामन्यात भारताचं पारडं जड आहे. भारताने हा सामना जिंकला तरी बांगलादेशच्या स्पर्धेतील आशा कायम राहतील. शेवटच्या सामन्यात पाकिस्तानला पराभूत केल्यास बांग्लादेश अंतिम फेरी गाठेल. त्यामुळे 25 सप्टेंबरचा पाकिस्तान बांग्लादेश हा सामना महत्त्वाचा ठरणार आहे.

श्रीलंकेला असेल संधी

श्रीलंकेने पहिला सामना गमावला असला तरी अजूनही आशा आहेत. श्रीलंकन संघाने उर्वरित दोन सामने जिंकले की हे गणित सुटेल. हे सामने पाकिस्तान आणि भारताविरुद्ध आहेत. अंतिम फेरीच्या शर्यतीत राहण्यासाठी श्रीलंकेला दोन्ही सामने जिंकावे लागतील. श्रीलंका पाकिस्तान सामना करो या मरोची लढाई आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.