इचलकरंजी: कबनूर ते शाहू पुतळा जाणाऱ्या रस्त्यावर शनिवारी (ता. २०) रात्री अपघात झाला. अपघातात मोटारीच्या धडकेत तीन मोटारसायकलींचे नुकसान झाले असून दोघे किरकोळ जखमी झाले. याप्रकरणी मयुरेश भरत संगाज (लायकर टॉकीज मागे, इचलकरंजी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. अपघात भरधाव व निष्काळजीपणे गाडी चालविल्याने झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
शिवाजीनगर पोलिस ठाण्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री अकराच्या सुमारास संशयित मयुरेश संगाज मोटार भरधाव वेगाने चालवत होता. रस्त्याच्या स्थितीकडे दुर्लक्ष करून त्याने मोटारीवरील नियंत्रण गमावून समोरून जाणाऱ्या आकाश श्रीकांत पिंगट (वय २५, रा. पाटील मळा, इचलकरंजी) यांच्या मोटारसायकलला मागून धडक दिली.
यानंतर अन्य दोन मोटारसायकलींना देखील धडकली. अपघातात आकाश पिंगट व आब्बास हुसेन पटेकरी (रा. भोने मळा, इचलकरंजी) किरकोळ जखमी झाले. तिन्ही मोटारसायकलींचे मिळून सुमारे ६५ हजारांचे नुकसान झाले आहे.