टी 20 आशिया कप 2025 स्पर्धेत आतापर्यंत कोणताच संघ टीम इंडियाला रोखू शकलेला नाही. टीम इंडियाने आतापर्यंत खेळलेले चारही सामने जिंकले आहेत. भारताने श्रीलंकेप्रमाणे साखळी फेरीत सलग तिन्ही सामने जिंकले. साखळी फेरीपर्यंत श्रीलंका आणि भारत दोन्ही संघ अजिंक्य होते. मात्र श्रीलंका विजयी घोडदौड कायम राखण्यात अपयशी ठरली. बांगलादेशने सुपर 4 मधील पहिल्याच सामन्यात श्रीलंकेला पराभूत करत विजय रथ रोखला. तर दुसर्या बाजूला टीम इंडियाने साखळी फेरीनंतर सुपर 4 मध्येही पाकिस्तानला लोळवत सलग चौथा विजय साकारला. भारताने यासह आपली विजयी घोडदौड कायम राखली. त्यामुळे आता सुपर 4 मध्ये इतर 2 संघांना भारताला रोखणं जमणार का? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष आहे. भारतीय संघाचे सुपर 4 फेरीतील उर्वरित 2 सामने केव्हा आणि कुठे होणार? हे जाणून घेऊयात.
सुपर 4 फेरीत आतापर्यंत एकूण 4 संघांनी 1 सामना खेळला आहे. बांगलादेशने श्रीलंकेला आणि टीम इंडियाने पाकिस्तानला पराभूत केलंय. आता 23 ते 26 सप्टेंबर दरम्यान सुपर 4 फेरीत आणखी 4 सामने होणार आहेत. त्यापैकी 2 सामने हे भारताचे होणार आहेत. मंगळवारी 23 सप्टेंबरला सुपर 4 फेरीतून पहिला संघ बाहेर होणार असल्याचं निश्चित आहे. या सामन्यात पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका आमनेसामने आहेत. दोन्ही संघांनी सुपर 4 मधील पहिला सामना गमावला आहे. त्यामुळे श्रीलंका आणि पाकिस्तानसाठी 23 सप्टेंबरचा सामना हा करो या मरो असा आहे. विजयी संघाचं स्पर्धेतील आव्हान कायम राहिल. तर पराभूत संघाला मायदेशी परतावं लागेल.
सुपर 4 फेरीत 24 सप्टेंबरला 2 अजिंक्य संघ आमनेसामने असणार आहेत. या सामन्यात बांगलादेशसमोर भारताचं आव्हान असणार आहे. हा सामना जिंकणारा संघ अंतिम फेरीसाठी जवळपास पात्र ठरणार आहे. त्यामुळे टीम इंडिया हा सामना जिंकणार की बांगलादेश मैदान मारणार याकडे चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
गुरुवारी 25 सप्टेंबरला पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश यांच्यात आमनासामना होणार आहे. तर सुपर 4 फेरीतील शेवटच्या सामन्यात 26 सप्टेंबरला भारत-श्रीलंका भिडणार आहेत. हेच दोन्ही संघ गेल्या आशिया कप 2023 फायनलमध्ये आमनेसामने होते. तेव्हा भारताने श्रीलंकेवर मात केली होती. श्रीलंका त्या पराभवाचा वचपा काढणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.