IND vs WI : टीम इंडियाला झटका;विंडीज विरूद्धच्या कसोटी मालिकेतून मॅचविनर बॅट्समन बाहेर!
Tv9 Marathi September 23, 2025 06:45 AM

भारतीय संघाने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात आशिया कप 2025 स्पर्धेत धमाकेदार कामगिरी सुरु ठेवत सलग चौथा विजय मिळवला आहे. टीम इंडियाने सुपर 4 मध्ये पाकिस्तानला पराभूत करत अंतिम फेरीच्या दिशेने 1 पाऊल पुढे टाकलं आहे. त्यामुळे सूर्यासेना उर्वरित सामन्यांमध्ये कशी कामगिरी करते? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागून आहे. टीम इंडिया आशिया कप 2025 स्पर्धेनंतर मायदेशात वेस्ट इंडिज विरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. मात्र त्याआधी टीम इंडियाच्या गोटातून वाईट बातमी समोर आली आहे. टीम इंडियाच्या मॅचविनर खेळाडूला दुखापतीमुळे विंडीज विरूद्धच्या मालिकेला मुकावं लागणार आहे.

भारत विरुद्ध विंडीज यांच्यात 2 ते 15 ऑक्टोबर दरम्यान एकूण 2 कसोटी सामने होणार आहे. टीम इंडियाची आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2025-2027 या साखळीतील दुसरी तर मायदेशातील पहिली कसोटी मालिका असणार आहे. तर विंडीजची या साखळीतील ही पहिलीच सीरिज असणार आहे. विंडीजने या मालिकेसाठी काही दिवसांआधीच संघ जाहीर केलाय. तर टीम इंडियाची घोषणा केव्हा होणार? याची प्रतिक्षा आहे. मात्र त्याआधी या मालिकेत विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत याला दुखापतीमुळे सहभागी होता येणार नसल्याचं मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटलं आहे. पंतला इंग्लंड दौऱ्यात दुखापत झाली होती.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, पंत विंडीज विरूद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये दुखापतीमुळे निवडीसाठी उपलब्ध नसल्याचं म्हटलं जात आहे. पंत या दुखापतीतून अजूनही बरा होऊ शकलेला नाही. त्यामुळे पंतच्या कमबॅकसाठी भारतीय चाहत्यांना आता आणखी काही आठवडे प्रतिक्षा करावी लागणार आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, पंत या दुखापतीतून पूर्णपणे बरा झालेला नाही. पंत सध्या बंगळरुतील सीओएमध्ये कमबॅक करण्यासाठी जोरदार कयारी करत आहे. पंतला अद्याप सीओएकडून फिट असल्याची एनओसी देण्यात आलेली नाही. त्यामुळे पंतने सरावाला सुरुवात केली नसल्याचं म्हटलं जात आहे. सीओएकडून हिरवा कंदील मिळताच पंत सरावाला सुरुवात करणार आहे.

ईएसपीएन-क्रिकइंफोच्या वृत्तानुसार, पंतची कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात निवड केली जाणार नाही. तसेच या 2 सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा 24 सप्टेंबरला केली जाऊ शकते.

पंतला काय झालं?

ऋषभ पंत याला इंग्लंड दौऱ्यात कसोटी मालिकेत दुखापत झाली होती. पंतला चौथ्या कसोटी सामन्यात बॅटिंग करताना पायाला दुखापत झाली. त्यामुळे पंतला पाचव्या सामन्याला मुकावं लागलं होतं. पंतच्या जागी ध्रुव जुरेल याचा समावेश करण्यात आला होता. त्यामुळे आता विंडीज विरुद्ध पंतच्या जागी विकेटकीपर म्हणून ध्रुवला संधी मिळण्याची शक्यता अधिक आहे.

भारत विरुद्ध विंडीज कसोटी मालिकेचं वेळापत्रक

पहिला सामना, 2 ते 6 ऑक्टोबर, अहमदाबाद

दुसरा सामना, 10 ते 14 ऑक्टोबर, नवी दिल्ली

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.