rat22p2.jpg, rat22p3.jpg
93143, 93144
दापोलीः केळस्करनाका व कामगारगल्ली येथे विजेच्या तारांवर वाढलेल्या वेली.
दापोलीत जंगली वेलींचा विळखा
वाहनांना अडथळा; वीजवाहिन्यांवर वाढल्याने धोका
सकाळ वृत्तसेवा
दापोली, ता. २२ : दापोली शहरातील मुख्य परिसरात पावसामुळे ठिकठिकाणी झाडाझुडपांचे साम्राज्य वाढलेले आहे. त्याचबरोबर काही ठिकाणी जंगलीवेली पसरल्या असून, त्या अपघाताला निमंत्रण देत आहेत. विजेच्या तारांना वेलींचे वेटोळे असून, त्याच्या भाराने तारा खाली पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
गेले तीन महिने दापोलीत चांगला पाऊस झाला आहे. या कालावधीत मोकळ्या जागेत, रस्त्याच्या बाजूला गवत, जंगरीवेली वाढलेल्या आहेत. जंगली झाडेही मोठ्या प्रमाणात उगवलेली आहेत. शहरातील केळस्करनाका आणि कामगारगल्ली परिसरात वाढलेल्या रानटी वेलींमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेला गंभीर धोका निर्माण झाला आहे. रस्त्याच्या कडेला असलेल्या विजेच्या आणि इतर तारांवर या वेलींनी मोठ्या प्रमाणावर आच्छादन केले असून, त्यामुळे वाहनांना ये-जा करताना अडथळा निर्माण होत आहे. दापोली शहरातील मुख्य परिसरात दिवसभर वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे तिथे अपघाताची शक्यता आहे. ठिकठिकाणी पसरलेल्या वेली तुटून खाली पडून वाहनांवर किंवा प्रवाशांवर कोसळू शकतात, अशी भीती स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. या संदर्भात नागरिकांनी पालिका व संबंधित विभागाचे लक्ष वेधले असून, तत्काळ छाटणी करून धोका दूर करण्याची मागणी केली आहे. पालिका अधिकाऱ्यांनीही या समस्येची दखल घेऊन लवकरात लवकर उपाययोजना करण्यात येतील, असे आश्वासन दिले आहे. नागरिकांनी सतर्क राहून या मार्गावरून जाताना विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
कोट
शहरात ठिकठिकाणी वेलींची ही समस्या पाहायला मिळते. पावसाळ्यात वेली अधिक वेगाने वाढत आहेत. प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे मोठा अपघात घडू शकतो.
- सलीम रखांगे, स्थानिक नागरिक