विक्रमगडमध्ये उद्या जनता दरबार
esakal September 23, 2025 01:45 PM

पालघर, ता. २२ (बातमीदार) : वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (ता. २४) सकाळी ११ वाजता विक्रमगड येथील पंचायत समिती येथे जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे. या दरबारामध्ये नागरिकांच्या समस्या, अडचणी जाणून घेण्यासाठी पालकमंत्री नाईक नागरिकांशी थेट संवाद साधणार आहेत. नागरिकांनी आपल्या समस्या, प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी विक्रमगड येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी केले.

जनता दरबारामध्ये नागरिकांच्या तक्रार अर्जांचे निवारण करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व कार्यालय प्रमुख उपस्थित राहणार आहेत. यापूर्वी आयोजित करण्यात आलेल्या जनता दरबारामध्ये नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता. या जनता दरबारामध्ये नागरिकांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून आपल्या समस्या किंवा प्रश्नांचा निपटारा करून घ्यावा, असे आवाहन जाखड यांनी केले आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.