Heavy Rain : बीड, जालन्यात ढगफुटी; नद्यांना मोठा पूर, अनेक गावांचा संपर्क तुटला
Saam TV September 23, 2025 01:45 PM

योगेश काशीद/ अक्षय शिंदे 

बीड/ जालना : राज्यात पावसाने पुन्हा एकदा हाहाकार माजवायला सुरवात केली आहे. यात रात्रीच्या सुमारास बीड आणि जालना जिल्ह्यातील अनेक भागात जोरदार पावसाने तडाखा दिला आहे. ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. तर नद्या व नाल्यांना मोठे पूर आल्याने काही मार्गावरील रहदारी देखील बंद झाली असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. 

आष्टी पाटोदा शिरूर कासारमध्ये ढगफुटी, अनेक गावांचा संपर्क तुटला
बीडजिल्ह्यामध्ये मध्यरात्री आष्टी, पाटोदा, शिरूर आणि बीड या भागामध्ये ढगफुटी झाली. यामुळे बीड जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले असून शेतकऱ्यांच्या शेतामध्ये तलावाचे स्वरूप आले आहे. तर अनेक गावांचा संपर्क तुटला असून सिंदफणा नदी पात्राने धोक्याची पातळी ओलांडली असून जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना सुरक्षितस्थळी जाण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Navnath Waghmare : नवनाथ वाघमारेंची जालन्यात गाडी पेटवली, धक्कादायक घटना कॅमेऱ्यात कैद

बाजारपेठेत पाणी शिरले; घरांसह व्यावसायिकांचे नुकसान

गेल्या दहा दिवसापासून सुरू असलेल्या पावसाने मध्यरात्री पुन्हा एकदा बीड जिल्ह्याला झोडपून काढले. शिरूर, कासारमध्ये दमदार पाऊस झाला असून सिंदफना नदीला पूर आला आहे. या पुराचे पाणी परिसरातील घरांमध्ये दुकानांमध्ये शिरले आहे. शिरूर शहरातून वाहणाऱ्या सिंदफणा नदीने रौद्ररूप धारण केले असून तहसील प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. मध्यरात्री अचानक दमदार पाऊस झाला आणि त्यामुळे ही पूरसदृश्य परिस्थिती दिसून येते आहे. घरांसह नदीकाठचे दुकानं सध्या पाण्यात आहे.

Navratri Utsav : सप्तशृंगी मंदिर २४ तास दर्शनासाठी राहणार खुले; देवीच्या आभूषणांची मिरवणूक काढत नवरात्र उत्सवाला प्रारंभ

जालन्यातील धारा, उमरी पाथरूड परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस
जालना : जालना जिल्ह्यात अनेक भागात काल मध्यरात्री मुसळधार पाऊस पडला आहे. तर काही भागात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. जालन्यातील धारा, पाथरूड, उमरी, शिवनगर, उखळी, शेवली या परिसरात काल मध्यरात्री ढगफुटी सदृश्य पाऊस पडला. या पावसामुळे नद्यांना ओढ्यांना पूर आला असून शेताला तलावाचे स्वरूप आले आहे. कपाशीच्या पिकात गुडघाभर पाणी साचलेलं कपाशी पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.