'हिंदू नाही तर बळीराजा खतरे में है!' अतिवृष्टीने शेतीची वाताहत, रोहित पवारांनी टोचले सरकारचे कान, काय केली मागणी?
Tv9 Marathi September 23, 2025 09:45 PM

अतिवृष्टीने राज्यातील सर्वच जिल्ह्यात दाणादाण उडवली आहे. अनेक गावात पुराचे पाणी शिरले. तर शेतजमीन खरडून वाहून गेली. शेताला तळ्याचे स्वरुप आले आहेत. गावात पाणी शिरल्याने चिखल झाला आहे. घरात पाणी शिरलं आहे. गावकऱ्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे. आता पंचनामे करण्याऐवजी सरसकट ओला दुष्काळ जाहीर करण्याची वेळ आली असताना राज्य सरकार पंचनाम्याचे घोडे नाचवत असल्याने अस्मानी सोबत सुलतानी संकटाविरोधात संताप व्यक्त होत आहे. त्यातच आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी सरकारचे कान टोचले आहेत.

मराठवाड्यात पावसाचा हाहाकार झाला आहे. अनेक गावात पूरपरिस्थिती उद्भवली आहे. अनके गावं पाण्याखाली गेली आहे. सोलापूरमध्ये सीणा नदीने रौद्ररूप दाखवले आहे. पहिल्यांदाच इतका महापूर पाहिल्याचे जुनीजाणती माणसं सांगत आहेत. तर विदर्भातील अनेक जिल्ह्यातही पावसाचा कहर दिसला आहे. उत्तर महाराष्ट्रासह पश्चिम महाराष्ट्रातील अनेक गावात पूराचा धोका आहे. काही गावात ढगफुटीसदृश्य पाऊस पडला आहे. 26 ते 36 लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यावर बोटं ठेवत रोहित पवारांनी मुख्यमंत्र्यांना मदतीचं आवाहन केलं आहे.

रोहित पवारांचं ट्विट काय?

राज्यातील पूरपरिस्थितीवर आमदार रोहित पवारांनी ट्विट केले आहे. “अतिवृष्टीने राज्यात भयावह परिस्थिती निर्माण झाल्याने मायबाप सरकारला सांगायचंय, आज जाती-धर्मात वाद करण्यापेक्षा हिंदू, मुस्लिम, ओबीसी, एससी, एसटी या सर्वच समाजाचे शेतकरी अडचणीत आहेत. म्हणूनच राजकारण बाजूला ठेवून माणुसकीधर्माला आणि महाराष्ट्र धर्माला जागून शेतकऱ्याला तातडीने मदत करण्याची नितांत गरज आहे. आधी अवकाळी आणि आता अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांचं अक्षरशः कंबरडं मोडलंय. शेतीचं झालेलं नुकसान बघितलं तर शेतकऱ्यांना निकषापेक्षा कितीतरी जास्त मदत करण्याची गरज आहे.” असं आवाहन रोहित पवारांनी केलं आहे.

अतिवृष्टीने राज्यात भयावह परिस्थिती निर्माण झाल्याने मायबाप सरकारला सांगायचंय, आज जाती-धर्मात वाद करण्यापेक्षा हिंदू, मुस्लिम, ओबीसी, एससी, एसटी या सर्वच समाजाचे शेतकरी अडचणीत आहेत. म्हणूनच राजकारण बाजूला ठेवून #माणुसकी_धर्माला आणि #महाराष्ट्र_धर्माला जागून शेतकऱ्याला तातडीने मदत…

— Rohit Pawar (@RRPSpeaks)

बळीराजा खतरे में है

आज हिंदू नाही तर बळीराजा खतरे में है. अशा परिस्थितीत आता पंचनाम्याचा हट्ट न धरता आजच्या कॅबिनेट बैठकीत ओला_दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये मदतीची घोषणा करा आणि हीच योग्य_वेळ असल्याने कर्जमाफीही जाहीर करा, ही आक्रोश करणाऱ्या बळीराजाच्यावतीने कळकळीची विनंती आमदार रोहित पवारांनी सरकारला केली आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.