निमगाव केतकीत तोफांची सलामी
esakal September 23, 2025 09:45 PM

निमगाव केतकी : निमगाव केतकी येथे भाद्रपदी बैलपोळा सण मोठ्या उत्साहात साजरा केला. सजवलेल्या बैलांची गावातून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी हलगीच्या कडकडाटात व तोफांची सलामी देऊन मिरवणूक काढली.
यांत्रिकीकरणामुळे बैलांच्या संख्येत मोठी घट झाल्याने आज हौशी शेतकऱ्यांनी बैलांना आकर्षक सजवून गावातून त्यांची मिरवणुक काढली. बहुतांश शेतकऱ्यांनी बैलांपुढे हलगी ग्रुप लावले होते.ग्रामदैवत मारुती महादेव मंदिराचे दर्शन घेऊन पारिजाक चौक, सुवर्णयुग गणेश मंदिर ते मुख्यरस्ता, संत सावतामाळी चौक, नवीपेठ या मार्गाने बैलांची मिरवणूक काढली.
सुभाष पाटील यांनी बैलांची मिरवणूक काढली त्यानंतर दत्तात्रेय बनकर, अंकुश जठार यांच्या तगड्या बैलजोडीने सर्वांचे लक्ष वेधले. वाड्या वस्त्यांवरील शेतकऱ्यांनीही आपली बैले वाद्याच्या गजरात मिरवली.
बैलांवर जिवापाड प्रेम करणारे अंकुश जठार यांनी त्यांच्या बैलाच्या मिरवणुकीत सुवर्णयुग गणेश मंदिराच्या प्रांगणात सुमारे शंभर ग्रामस्थांना फेटे बांधून हा सण आनंदाने साजरा केला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.