नाशिक: घटस्थापनेच्या मुहूर्तावर सोमवार (ता. २१)पासून वस्तू व सेवाकराचे (जीएसटी) नवीन दर लागू होणार आहेत. जीएसटीच्या या बदलामुळे खाद्यपदार्थांपासून ते तयार कपडे, तसेच ऑटोमोबाईल क्षेत्रातील दर कमी होणार आहेत. ग्राहकांना त्याचा थेट आर्थिक लाभ मिळणार असल्याने बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण आहे. सर्वसामान्यांच्या महिन्याच्या बजेटमधून बाराशे त पंधराशे रुपये वाचणार आहेत, हे या बदलाचे प्रमुख वैशिष्ट्य असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.
केंद्र सरकारने जीएसटीची पुनर्रचना केली आहे. त्यामध्ये १२ आणि २८ टक्के स्लॅब रद्द करताना केवळ ५ आणि १८ टक्क्यांचा कराचा स्लॅब कायम ठेवण्यात आला. या बदलामुळे पनीर व दुग्धजन्य पदार्थ, ३३ जीवनाश्यक वस्तू व शैक्षणिक साहित्यावरील कर शून्य करण्यात आला आहे. २८ टक्क्यांचा स्लॅब रद्द झाल्याने ऑटोमोबाईल, ४३ इंचांवरील टीव्ही, एसीचे दर कमी होणार आहेत.
याव्यतिरिक्त वैयक्तिक आरोग्य आणि जीवनविम्यात सवलत मिळणार आहे. तयार कपडे, पादत्राणे तसेच इतर जीवनावश्यक वस्तूंचे दरही कमी होणार आहेत. शासनाच्या निर्देशानुसार नवरात्रीच्या पहिल्या माळेपासूनच (ता. २२) या बदलाची अंमलबजावणी करायची आहे. त्यामुळे या निर्णयाचा थेट फायदा सर्वसामान्य जनतेला होणार आहे.
जीएसटी पुनर्चना व सण-उत्सवांच्या कालावधीमुळे बाजारपेठेत उत्साह निर्माण झाला आहे. ग्राहकांना या बदलाचा थेट फायदा करून देण्यासाठी व्यापाऱ्यांनी तयारी करताना उत्सवानिमित्त आकर्षक योजनादेखील आणल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांमध्येही उत्साह असून, इलेक्ट्रॉनिक वस्तूंसह ऑटोमोबाईल क्षेत्रात चौकशी व बुकिंगचे प्रमाण वाढले आहे. जीएसटी बदलामुळे बाजारपेठेत चलन उलाढालीला थेट फायदा होईल, असा विश्वास या आर्थिक क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
मार्चपर्यंत विक्रीला परवानगी
जीएसटी पुनर्रचनेत जुना माल विक्रीसाठी केंद्र सरकारने मार्चपर्यंत मुदत दिली आहे. पण, हा माल विक्री करताना जीएसटी बदलाचा लाभ ग्राहकांना द्यावा, असे स्पष्ट आदेश शासनाचे आहेत. खाद्यपदार्थांसाठी किमान ४५ दिवसांची अंतिम मुदत असते, त्यामुळे खाद्यपदार्थांमध्ये सहसा जुन्या मालाचा विषय मार्गी लागेल. परंतु, इलेक्ट्रॉनिक व अन्य वस्तूंचा माल मार्चपर्यंत नवीन बदलानुसार विक्री करावा लागेल.
नवीन किमतीचे स्टिकर्स
जीएसटी बदलानंतर व्यापारी व व्यावसायिकांनी त्यांच्या मालावर नव्याने किमतीचे स्टिकर्स लावल्याची माहिती या क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिली आहे. पनीर, दुग्धजन्य पदार्थांसह खाद्यपदार्थांच्या नवीन स्टॉकवर बदल करण्यात आल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले.
किमतीत असे होणार बदल
जीएसटी बदलानंतर ४३ इंचांपासून पुढील टीव्ही तसेच एसीच्या किमतीत बदल होणार असून, त्याचा थेट फायदा ग्राहकांना मिळणार आहे. ४३ इंचांच्या टीव्हीची किंमत रविवार (ता. २१)पर्यंत ४५ हजार रुपये इतकी होती. बदलानंतर नवीन दरानुसार ४१ हजार ५०० रुपयांपर्यंत किंमत खाली येईल. एक लाखाच्या टीव्हीमागे साधारणत: आठ हजारांची बचत होईल. दरम्यान, एक टनाच्या एसीचे दर ३२ हजारांवरून २९ हजार ५०० रुपयांपर्यंत खाली येतील.
ऑटोमोबाईल क्षेत्राला बूस्ट
जीएसटी बदलाचा सर्वाधिक लाभ ऑटोमोबाईल क्षेत्राला होणार आहे. पुनर्रचनेत छोट्या कारच्या किमती कमी होण्यास मदत मिळणार आहे. विविध कंपन्यांच्या कारच्या किमतीत साधारणत: ६८ हजारांपासून ते एक लाख ३० हजारांपर्यंत किमती कमी होतील.
या वस्तू स्वस्त
घरगुती वापराच्या ज्या वस्तूंवर आधी १२ टक्के कर लावण्यात आला होता, त्या वस्तूंचा समावेश पाच टक्के कराच्या श्रेणीत झाला आहे. या वस्तूंमध्ये टूथपेस्ट, साबण, शाम्पू, बिस्किटे, स्नॅक्स, फळांचा रस, इतर पॅकबंद खाद्यपदार्थ, तूप, पनीर, दूध, दही, कंडेन्स्ड दूध, सायकल, स्टेशनरीचे सामान, ठरावीक किमतीचे कपडे, चप्पल आणि बूट यांचा समावेश आहे. ज्या वस्तूंवर पूर्वी २८ टक्के कर आकारला जात असे, त्या वस्तूंवर आता १८ टक्के कर लागणार आहे. अशा वस्तूंमध्ये एअर कंडिशनर, रेफ्रिजरेटर, डिशवॉशर, सिमेंट, १२०० सीसी पेक्षा कमी इंजिन क्षमता असलेल्या मोटरकार, दुचाकी वाहने यांचा समावेश आहे.
Uttrakhand : पंतप्रधानांच्या दूरदृष्टीचा परिणाम आहे GST 2.0 जो भारताच्या विकासाला मजबूती देईल : CM पुष्कर सिंह धामीबाजारपेठेत चैतन्य आहे. व्यापारी आणि व्यावसायिकांनी बदल केले आहेत. सोमवारपासून (ता. २२) ग्राहकांना लाभ मिळणार आहे. या बदलामुळे बाजारपेठेतील चलनाचा वापर वाढणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना फायदा होईल. पण अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल.
- ललित गांधी, अध्यक्ष, महाराष्ट्र चेंबर ऑफ कामर्स
४३ इंचांवरील टीव्ही व एसीचे दर कमी होतील. पण फ्रीज व वॉशिंग मशिनच्या दरात कोणतेही बदल होणार नाहीत. जीएसटीचे कमी झालेले दर तसेच सण-उत्सवांतील ऑफर्समुळे ग्राहकांना दुहेरी लाभ मिळणार आहे.
-रवींद्र पारख, संचालक, पारख अप्लायन्सेस