93065
नेमळे विद्यालयाच्या मुलींची
खो-खो स्पर्धेसाठी निवड
सावंतवाडी, ता. २२ ः नेमळे पंचक्रोशी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या भगीरथ मैदानावर झालेल्या तालुकास्तरीय शालेय खो-खो स्पर्धेत १७ वर्षांखालील मुलींच्या गटात नेमळे विद्यालयाच्या मुलींनी अंतिम सामन्यात कलंबिस्त हायस्कूलचा पराभव करून प्रथम क्रमांक मिळवला. या विजयी संघाची जिल्हास्तरावर निवड झाली आहे. याच स्पर्धेत १९ वर्षांखालील मुलांचा संघ उपविजेता ठरला. सावंतवाडी तालुक्यातील नावलौकिक प्राप्त या शाळेतील खेळाडूंनी यापूर्वी जिल्हा, विभागीय व राज्यस्तरापर्यंत थाळीफेक, गोळाफेक, भालाफेक, खो-खो, कबड्डी, वेटलिफ्टिंग अशा विविध खेळांत कौशल्य सिद्ध केले आहे. यशस्वी खेळाडू व क्रीडा शिक्षक आर. के. राठोड यांचे नेमळे पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आ. भि. राऊळ, उपाध्यक्ष हेमंत भगत, मुख्य कार्यकारी अधिकारी रमाकांत प्रभूतेंडोलकर, सचिव स. पा. आळवे, प्राचार्या श्रीमती कल्पना बोवलेकर आदींनी अभिनंदन केले.
-----------
93064
घोटगे शाळेत वह्यांचे वाटप
दोडामार्ग, ता. २२ ः भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सिंधुदुर्ग जिल्हा चिटणीस सुधीर दळवी यांच्या माध्यमातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घोटगे नंबर १ या प्रशालेतील विद्यार्थ्यांना वह्या वाटप केल्या. सरपंच भक्ती भरत दळवी व पोलिसपाटील स्नेहा दळवी यांच्या हस्ते हा उपक्रम पार पडला. उपसरपंच विजय दळवी, ग्रामपंचायत सदस्य अजय दळवी, समीक्षा दळवी, मंजिरी जाधव, स्वप्नाली दळवी, श्रीराम दळवी, मुख्याध्यापक वासुदेव चव्हाण, दीपक घाडी, रामा गवस आदी उपस्थित होते.