चिपळुणात जिल्हा परिषदसाठी दिग्गजांचा पत्ता कट
९ गटांपैकी ७ ठिकाणी महिला; कोकरे, उमरोली सर्वसाधारण
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १३ ः पंचायत समिती निवडणुकीत अनेक पदाधिकाऱ्यांना स्वारस्य राहिले नव्हते. त्यामुळे अनेकांनी जिल्हा परिषद निवडणुकीची तयारी केली होती; मात्र तालुक्यातील ९ जिल्हा परिषद गटापैकी ७ ठिकाणी महिला आरक्षण पडले आहे. परिणामी, जिल्हा परिषदेची तयारी करणाऱ्या अनेक दिग्गजांचा पत्ता कट झाला आहे.
जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी सोमवारी आरक्षण जाहीर झाले. त्यानुसार तालुक्यातील सावर्डे, कळवंडे, पेढे, अलोरे आणि वहाळ जिल्हा परिषद गटासाठी सर्वसाधारण महिला आरक्षण पडले आहे, तर अलोरे आणि शिरगांव नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्रीकरिता राखीव झाला. सर्वसाधारण गटासाठी उमरोली आणि कोकरे गट आरक्षित राहिला आहे. पंचायत समितीला विकासकामांना मोठ्या प्रमाणात निधी मिळत नाही. सेस आणि १५वा वित्त आयोग निधीवर सदस्यांना अवलंबून राहावे लागते. वर्षाकाठी एका सदस्याला जेमतेम चार ते पाच लाखांची विकासकामे आपल्या गणासाठी मंजूर होतात. त्यामुळे पंचायत समिती सदस्यांपेक्षा गावचा सरपंच झालेला बरा, अशी भावना गेल्या चार-पाच वर्षांपासून वाढीस लागली होती. यामुळे अनेक माजी पंचायत समिती सदस्यांचा डोळा जिल्हा परिषद निवडणुकीच्या आरक्षणाकडे होता.
जिल्हा परिषदेच्या गतनिवडणुकीत तालुक्यातील जिल्हा परिषद गटात पुरुषांची संख्या ही अधिक होती. यावेळी मात्र दिग्गजांचा चांगलाच हिरमोड झाला आहे. तालुक्यातील ९ जिल्हा परिषद गटापैकी ७ ठिकाणी महिला आरक्षण असल्याने जिल्हा परिषदेत तालुक्यातील महिलांचा आवाज घुमणार आहे. महिलांसाठी जादा जागा आरक्षित झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेससह, शिंदे सेना, ठाकरेसेना तसेच भाजप पदाधिकाऱ्यांचा हिरमोड झाला आहे.
चौकट
पूजा निकम यांना उमेदवारीची संधी
महिलाराज असल्याने राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून सावर्डेत आमदार शेखर निकम यांच्या पत्नी माजी सभापती पूजा निकम यांना उमेदवारीची संधी मिळू शकते. खेर्डी गट नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी राखीव असला, तरी येथे सर्वच पक्षात इच्छुकांची मांदियाळी असल्याने उमेदवारी देण्यापासून नेत्यांचा कस लागणार आहे. अलोरे, शिरगाव, वहाळ, पेढे गटात अनुभव असलेले पदाधिकारी जिल्हा परिषदेची तयारी करत होते; मात्र या चारही गटांत महिलाराज असल्याने त्यांचा हिरमोड झाला आहे.