पूरग्रस्त बळीराजासाठी कल्याणकरांची मदत
जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य, औषधे धाराशिवकडे रवाना
कल्याण, ता. १४ (वार्ताहर) : महाराष्ट्रातील सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यांत मुसळधार पावसामुळे अनेक गावे जलमय झाली आहेत. हजारो एकर शेती पाण्याखाली गेल्याने, तसेच जनावरे, धान्य आणि घरे वाहून गेल्यामुळे ग्रामीण भागातील बळीराजा संकटात सापडला आहे. या भीषण परिस्थितीत पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी कल्याणकर पुढे आले आहेत.
कल्याण शहरातून पूरग्रस्त भागांसाठी जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य, कपडे आणि औषधे घेऊन एक ताफा सोलापूर व धाराशिव जिल्ह्याकडे रवाना झाला आहे. कल्याण पश्चिमेतील बेतुरकर पाडा विभाग मित्र परिवाराच्या पुढाकारातून ही मदत पाठवण्यात आली.
दिवाळी सण काही दिवसांवर आला असताना, पुरामुळे शेतकऱ्यांची कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. त्यांच्या आयुष्यात पुन्हा आशेचा किरण निर्माण करण्याच्या उद्देशाने ‘बेतुरकर पाडा विभाग मित्र परिवारा’ने जीवनावश्यक वस्तूंच्या मदतीचे आवाहन केले होते. या आवाहनाला कल्याणातील सामाजिक संस्था, लोकप्रतिनिधी आणि दानशूर व्यक्तींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
मदत मोहिमेत शहरातील विविध सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी आणि स्वयंसेवकांनी उत्साहाने सहभाग घेतला. माजी आमदार नरेंद्र पवार, माजी नगरसेवक संदीप गायकर आणि त्यांचे सहकारी यांच्यासह राजेश ठाणगे, अक्षय वाघ, दिनेश अभंग, भाऊ धुमाळ, अमित आहेर, अमेय आमले, शुभम अभंग, अक्षय देशमुख, कपिल देसले, बसवराज कोळी, कुणाल जगताप, अजित म्हस्के आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या मदतकार्यात सिंहाचा वाटा उचलला.