धर्मवीर आनंद दिघे उद्यान दुर्लक्षित
esakal October 15, 2025 08:45 AM

धर्मवीर आनंद दिघे उद्यान दुर्लक्षित
सुरक्षा रक्षकाअभावी तीन महिन्यांपासून कुलूपबंद; नागरिकांचा आंदोलनाचा इशारा
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १४ : डोंबिवली एमआयडीसी निवासी क्षेत्रातील केडीएमसीचे ‘धर्मवीर आनंद दिघे उद्यान’ गेल्या काही महिन्यांपासून कुलूपबंद अवस्थेत असून, त्याकडे महापालिकेचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. सुरक्षा रक्षकाची नेमणूक न केल्यामुळे हे उद्यान सलग तीन ते चार महिन्यांपासून बंद असल्याची माहिती येथील जागरूक नागरिक देत आहेत. दिवाळीच्या सुट्ट्या लागल्याने लहान मुलांना खेळण्यासाठी जागा नाही, तर ज्येष्ठ नागरिक आणि इतरांना जॉगिंग ट्रॅक आणि ओपन जीमचा वापर करता येत नाही. तसेच उद्यानातील बाकड्यांवर बसून गप्पागोष्टी आणि विश्रांती घेणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची यामुळे मोठी गैरसोय झाली आहे.

डोंबिवली एमआयडीसी निवासी, मॉडेल स्कूलजवळ असलेले हे उद्यान वारंवार बंद राहत असल्याने लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना फटका बसत आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेकडून ठेकेदारी पद्धतीने सुरक्षा रक्षकाची नेमणूक न झाल्याने हे उद्यान गेल्या तीन महिन्यांपासून बंद आहे, अशी माहिती नागरिक राजू नलावडे यांनी दिली. एप्रिल-मे महिन्यातही सुरक्षा रक्षकाअभावी हे उद्यान बंद असल्याची बाब त्यांनी उघडकीस आणली होती. या उद्यानावर आतापर्यंत खासदार आणि आमदार निधीतून लाखो रुपये खर्च झाले आहेत. सध्याच्या घडीला मात्र महापालिकेच्या दुर्लक्षामुळे या उद्यानाची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. नलावडे यांनी सांगितले, की सत्ताधारी केवळ ‘धर्मवीर आनंद दिघे’ यांच्या नावाचा वापर करतात. पण त्यानंतर संबंधित वास्तूंची देखभाल-दुरुस्ती होत नाही.

आंदोलनाचा इशारा
गेले वर्षभर सुरक्षा रक्षकाची नेमणूक न झाल्याने हे उद्यान वारंवार बंद ठेवावे लागत आहे. माजी नगरसेवक भालचंद्र म्हात्रे, स्थानिक रहिवासी सागर पाटील, मंदार स्वर्गे, राजू नलावडे यांनी सतत महापालिका उद्यान विभाग आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्याकडे पाठपुरावा करूनही उद्यानाची स्थिती सुधारली नाही. हे उद्यान कुलूपबंद राहत असल्याने येथील रहिवासी आता नाइलाजाने आंदोलनाच्या तयारीत असल्याची माहिती नलावडे यांनी दिली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.