जळगाव: धावत्या रेल्वेमधून तब्बल २ किलो ३०० ग्रॅम सोन्याची बॅग चोरट्याने लंपास केली. ही घटना रविवारी (ता. १२) रात्री नऊच्या सुमारास बडनेरा रेल्वे स्थानकावर घडली. तीन कोटींच्या दागिन्यांची बॅग लंपास झाल्याचे वृत्त जळगावात धडकताच सराफ बाजारात भीतीचे वातावरण पसरले आहे. अमरावती लोहमार्ग पोलिस गुन्ह्याच्या तपासात लागले असून, त्यांनी काही संशयितांना ताब्यात घेत चौकशी सुरू केल्याची माहिती समोर आली आहे.
रेल्वेच्या अधिकृत सुत्रांच्या माहितीनुसार, जळगावातील सराफा व्यावसायिक किशोर वर्मा दिवाळीपूर्वी अमरावतीतील स्थानिक सराफा व्यापाऱ्यांना दागिने व सोन्याचा तयार माल, डिझाईन दाखविण्यासाठी आले होते. संपूर्ण दिवस व्यावसायिकांसोबत भेटीगाठी घेऊन व्यवहार केल्यानंतर ते परतीसाठी हावडा-मुंबई मेल या रेल्वेने जळगावकडे येण्यासाठी निघाले होते. रेल्वेस्थानकावरून गाडी सुटताच गर्दीचा फायदा घेत चोरट्याने त्यांच्या हातातील सुमारे २ किलो ३०० ग्रॅम सोन्याच्या तयार दागिन्यांची बॅग लंपास केली.
घडल्या प्रकारानंतर तत्काळ जीआरपी पोलिसांकडे धाव घेत तक्रार देण्यात आली. पोलिसांनी रेल्वेस्थालनक परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली. मात्र संशयिताचा अद्याप ठावठिकाणा लागलेला नव्हता. पोलिसांच्या मते, ही चोरी नियोजनबद्ध आणि धाडसी पद्धतीने करण्यात आल्याचा अंदाज आहे, धावत्या रेल्वेत पाळत ठेऊनच नियोजनबद्ध रित्या चोऱ्या करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. या घटनेनंतर जळगाव व अमरावती सराफा बाजारात एकच खळबळ उडाली असून, सकाळपासून एकच चर्चेला उधाण आले आहे.
Pune Police : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातून १८ सराईत गुन्हेगार तडीपारतपासासाठी विशेष पथक
दिवाळी तोंडावर असल्याने सराफ बाजारात मोठी उलाढाल सुरू असून, जळगावच्या सोन्यासह तयार दागिन्यांना महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून मोठी मागणी या काळात असते. मात्र, या घटनेमुळे परजिल्ह्यातून मालाची ने-आण करणारे, पैशांचे व्यवहार करणाऱ्या व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. लोहमार्ग पोलिसांसह स्थानिक पोलिसांकडून संशयितांचा शोध सुरू असून, या प्रकरणी विशेष पथक तयार करून चोरट्यांचा मागोवा घेण्यासाठी तांत्रिक साधनांची मदत घेतली जात आहे.