वसई तालुक्यात काला, क्रीडा महोत्सवाच्या तयारीला वेग
विरार, ता. १५ (बातमीदार) : वसई तालुका कला, क्रीडा महोत्सवाचे हे ३६वे वर्षे आहे. या महोत्सवाच्या तयारीला आता वेग आला आहे. यासंदर्भातील बैठक नुकतीच वसई क्रीडा मंडळामध्ये पार पडली. यावर्षी नव्याने मल्लखांब स्पर्धेचा नव्याने समावेश करण्यात आला आहे.
अनंत चतुर्दशीनंतर येणाऱ्या शनिवारपासून प्रत्येक शनिवारी डिसेंबरपर्यंत महोत्सवासंदर्भातील आढावा बैठका घेतल्या जातात. वसई तालुक्यातील कला आणि क्रीडा क्षेत्रात विद्यार्थी-विद्यार्थिनी, युवक-युवती यांच्या कलागुणांना वाव देऊन त्यांना जिल्हास्तरीय, राज्य पातळीवर, देशपातळीवर तसेच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत आपली प्रतिभा दाखवण्यासाठी वसई तालुका कला, क्रीडा महोत्सव गेली ३६ वर्षे काम करीत आहे, असे मंडळाचे अध्यक्ष दत्ताराम माणेरीकर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले. एकूण ७५ पेक्षा जास्ती स्पर्धा कला आणि क्रीडा मिळून त्यामध्ये ५५ हजारांपेक्षा जास्त स्पर्धक सहभागी होतात. ही एक कलाकार आणि क्रीडापटूंसाठी एक पर्वणी असते. या वर्षी नवीन स्पर्धा मल्लखांब स्पर्धा मुले आणि मुली यांच्यासाठी आयोजित करण्यात येणार आहे.
यामध्ये मुलांसाठी मल्लखांब व मुलींसाठी रोपवर स्पर्धा होणार आहेत. ३६व्या वर्षामध्ये अजून एका नवीन स्पर्धेची प्रात्यक्षिक स्पर्धा हाताचा पंजा लढवणे व सेपक तकरा म्हणजे व्हॉलीबॉल स्पर्धा म्हणजे हाताचा स्पर्श न करता पाय, गुडघे, छाती, खांदे, डोकं यांच्या साह्याने प्लॅस्टिकच्या बॉलने होणार आहे. गेल्या वर्षी ज्युडो, रुबिक क्यूब, स्क्वॅश, दहीहंडी अशा अनेक स्पर्धांचा समावेश करण्यात आला होता. या सभेस अध्यक्ष दत्ताराम माणेरीकर, माजी महापौर प्रवीण शेट्टी, कार्याध्यक्ष प्रकाश वनमाळी, सरचिटणीस केवल वर्तक, संघटक सचिव अनिल वाझ, कलाप्रमुख प्रशांत घुमरे, क्रीडाप्रमुख विजय चौधरी व सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.