Kolhapur Political News : कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या ६८ गटांचे आरक्षण जाहीर होताच जिल्ह्यात राजकीय घडामोडींना उकळी. काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना आदी पक्षांत उमेदवारीसाठी चुरस, घराणेशाही की नव्या चेहऱ्यांना संधी हा प्रश्न अधिक तीव्र. सोशल मीडियावर प्रचाराची चढाओढ सुरू.
जिल्हा परिषदेच्या ६८ गटांचे आरक्षण जाहीर होताच जिल्ह्यातील राजकीय समीकरणांना उकळी फुटली आहे. काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी (शरद पवार गट), राष्ट्रवादी (अजित पवार गट), शिवसेना (उद्धव ठाकरे गट), शिवसेना (शिंदे गट) अशा प्रमुख पक्षांसह महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही पटलांवर उमेदवारांच्या मोर्चेबांधणीला उधाण आले आहे. प्रत्येक गटात तीन ते चार इच्छुकांनी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या ‘फिल्डिंग’ लावल्याचे चित्र आहे. यावेळी लोकांना केवळ पक्ष नव्हे, तर उमेदवाराचाही दर्जा, पारदर्शकता आणि समाजकार्य पाहायचे आहे. त्यामुळे ‘पक्षनिष्ठा अधिक व्यक्तिमत्त्व’ हे समीकरण निर्णायक ठरणार आहे.
आरक्षणाच्या घोषणेनंतर अनेक जिल्हा परिषद गटांत पारंपरिक पद्धतीने सत्तेत असलेल्या कुटुंबांचा दावा जोर धरताना दिसत आहे. काही गटांत सलग दोन-तीन टर्मपासून निवडून येणाऱ्या कुटुंबांनी उमेदवारीसाठी पक्षावर दबाव आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. दुसरीकडे, पक्षातील तरुण कार्यकर्ते आणि समाजकार्यात सक्रिय असलेले नवीन चेहरे यांनाही आता संधी द्यावी, अशी मागणी जिल्हा आणि तालुकास्तरावरून होत आहे.
Kolhapur Politics : पंचायत समिती आरक्षण सोडतीवेळी प्रशासनाची चूक, माजी जिल्हा परिषद सदस्याचा बीपी झाला लो अन्...यामुळेच महाविकास आघाडी असो वा महायुती, दोन्ही ठिकाणी ‘तिकीट घरच्यांनाच की कार्यकर्त्यांना? ‘असा प्रश्न उभा राहिला आहे. पक्ष नेतृत्वापुढे घराणेशाही टिकवायची की नव्या कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढवायचा, असा पेच निर्माण झाला आहे. दरम्यान, उमेदवारीसाठी इच्छुकांनी पक्षातील नेत्यांशी संपर्क वाढवला आहे. जिल्हा ते मुंबईपर्यंतच्या साखळीत लॉबिंग सुरू असून, काही गटांत तर आमदार आणि माजी मंत्र्यांच्याही पातळीवर शिफारशींचा खेळ रंगला आहे. प्रत्येक जण ‘तिकीट माझ्याच नावावर’ यासाठी सर्वस्व पणाला लावताना दिसत आहे.
काही ठिकाणी मात्र पक्षातील स्थानिक पातळीवरील नेत्यांनी थेट आपापसातील चर्चांनंतर एकमत साधण्याचा प्रयत्न सुरू केला आहे; पण बहुतांश गटांत तणाव, नाराजी आणि गटबाजी स्पष्ट दिसून येणार आहे. महायुतीत तिकीट वाटपाचा पेच निर्माण होणार असल्याचे दिसून येत आहे. करवीर, पन्हाळा, गगनबावडा, भुदरगड तालुक्यांसह ज्या ठिकाणी खुला प्रवर्ग आणि सर्वसाधारण महिला प्रवर्गाचे आरक्षण आहे. त्या ठिकाणी हा वाद उफाळून येणार आहे.
सोशल मीडियावर प्रचाराला सुरुवात
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पक्षाचे तिकीट जाहीर व्हायच्या आधीच अनेक इच्छुकांनी सोशल मीडियावर प्रचार सुरू केला आहे. फेसबुक, व्हॉट्सअॅप, इंस्टाग्राम आणि स्थानिक न्यूज ग्रुप्सवर ‘सेवा कार्य’, ‘समाजासाठी झटणारा कार्यकर्ता’, ‘माझा गट, माझा अभिमान’ अशा टॅगलाईन्ससह पोस्ट्सचा वर्षाव सुरू आहे. काहींनी तर ‘माघार नाही, लढणारच’ अशा भूमिकेतून स्वतंत्र लढाईची तयारीही दाखवली आहे. यामुळे पक्ष नेतृत्वासमोर आणखी एक आव्हान उभे राहिले आहे. तिकीट न मिळालेल्यांना समजावून घेणे आणि बंडाळी टाळावी लागणार आहे.