सतीश शिंदेचा उपचारादरम्यान मृत्यू
आरोपींवर आता खुनाचा गुन्हा दाखल
कर्जत, ता. १५ : (बातमीदार) : कर्जत तालुक्यातील धाकटे वेणगाव येथे ९ ऑक्टोबरला शिंदे कुटुंबीयांवर जीवघेणा हल्ला झाला होता. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेला सतीश प्रफुल शिंदे (वय २३) याचा परळ येथील केईएम रुग्णालयात रविवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे पोलिसांनी आरोपींवर आधी दाखल असलेल्या गुन्ह्यात आता खुनाचा (भादंवि कलम ३०२) गुन्हा वाढवला आहे.
आरोपी किरण नितीन शिंदे, मंगेश बाळू जाधव, जय सुनील साबळे आणि दोन साथीदारांनी ९ ऑक्टोबरच्या पहाटे चॉपर, कोयता आणि धारदार शस्त्रांनी घरात घुसून सतीश, त्याचा भाऊ प्रतीक आणि आई-वडिलांवर हल्ला केला होता. या हल्ल्यात सतीशच्या पोटावर वार झाल्याने तो गंभीर जखमी झाला होता. त्याचा मृत्यू झाल्याने धाकटे वेणगाव परिसरात हळहळ व्यक्त होत असून, ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण आहे. प्रतीक आणि त्याच्या आई-वडिलांची प्रकृती स्थिर आहे.
दरम्यान, आरोपींनीदेखील मारहाण झाल्याचा दावा करीत फिर्यादींविरोधात ऑनलाइन गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक संदीप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक महिला पोलिस निरीक्षक मनीषा लटपटे करीत आहेत.