रोह्यात स्मार्ट प्रीपेड मीटरविरोधात धडक मोर्चा
महावितरण कार्यालयाला दिले निवेदन
रोहा, ता. १५ (बातमीदार) ः स्मार्ट प्रीपेड मीटरविरोधात सर्वहारा जनआंदोलन व महाविकास आघाडीने रोहा महावितरण कार्यालयावर बुधवारी (ता. १५) जनआक्रोश धडक मोर्चा काढला होता. या वेळी महावितरणचा निषेध असो, स्मार्ट मीटर बंद करा, अशा घोषणा देत मोर्चेकरांनी रोहा शहर दणाणून सोडले.
सध्या रोहा शहर व ग्रामीण भागात विजेचे जुने मीटर बदलून नवीन स्मार्ट मीटर बसवण्याचा सपाटा सुरू आहे. स्थानिकांच्या विरोधाला न जुमानता महावितरणचे ठेकेदार बिनदिक्कतपणे स्मार्ट मीटर बसवत आहेत. याविरोधात सर्वहारा जनआंदोलन व महाविकास आघाडीने पुढाकार घेत मोर्चाची हाक दिली होती. या मोर्चाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला. या वेळी सर्वहारा जनआंदोलनाच्या नेत्या उल्का महाजन, शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण, तालुका अध्यक्ष तुषार खरीवले, मनसे जिल्हा सचिव अमोल पेणकर, मनसे माजी तालुका अध्यक्ष अक्षय रटाटे, मनविसे रोहा तालुका अध्यक्ष प्रफुल्ल पाटील, रोहा तालुका काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सुनील देशमुख, सर्वहारा जनआंदोलन जिल्हाध्यक्ष सोपान सुतार, ठाकरे गटाचे तालुका प्रमुख नितीन वारंगे, माजी तालुकाप्रमुख विष्णू लोखंडे, ज्येष्ठ सल्लागार रमेश विचारे, सुधीर सोनावणे, उप तालुका प्रमुख सचिन फुलारे, उपाध्यक्ष पांडुरंग वाघमारे, कार्याध्यक्ष चंद्रकांत गायकवाड व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने महावितरणचे कार्यकरी अभियंता प्रमोद दालू यांची भेट घेऊन आपल्या मागण्याचे निवेदन देत स्मार्ट मीटरला तीव्र विरोध दर्शवला.
फोटो कॅप्शन :
रोहा ः स्मार्ट मीटरविरोधात धडक मोर्चा काढून निवेदन देण्यात आले.