शेटफळगढे, ता १५ : धनादेश न वटल्याप्रकरणी म्हसोबाची वाडी (ता. इंदापूर) येथील एकास १० लाख रुपये दंड व चार महिन्यांच्या सश्रम कारावासाची शिक्षा बारामती प्रथम वर्ग न्यायालयाने सुनावली आहे. दंड न भरल्यास एक महिन्याचा वाढीव कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
म्हसोबाची वाडी येथील सचिन झेंडे यांनी गावातीलच सौरभ छगन नांदगुडे यांना शिक्षण संस्थेच्या व घरगुती अडचण अशा वेगवेगळ्या कारणासाठी दहा लाख रुपये दिले होते. त्यानंतर सौरभ नांदगुडे यांनी सचिन झेंडे यांना या रकमेपोटी प्रत्येकी पाच लाखाचे दोन धनादेश दिले होते; मात्र तो धनादेश न वाटल्याने सचिन झेंडे यांनी बारामती येथील न्यायालयात नांदगुडे यांच्या विरोधात फसवणुकीचा दावा दाखल केला होता. या दाव्यामधील झेंडे यांचे म्हणणे न्यायालयाने मान्य करीत सौरभ छगन नांदगुडे यांना कलम १३८ अंतर्गत चार महिन्यांचा सश्रम कारावास व १० लाख रुपये दंड ठोठावला आहे. या दंडाची रक्कम वसूल झाल्यानंतर झेंडे यांना तत्काळ देण्याचा आदेशही न्यायालयाने दिला असल्याचे तक्रारदार सचिन झेंडे यांनी सांगितले.