उत्तम नागरिक घडवण्यासाठी पुस्तकांचे वाचन आवश्यक
अनिल फड यांचे प्रतिपादन; कल्याणमध्ये ‘मंजुदेवी लोढा वाचनालय’ सुरू
कल्याण, ता. १५ (वार्ताहर) : लोकभूमी प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेतर्फे श्रीमती मंजुदेवी लोढा वाचनालय, ग्रंथालय, डिजिटल लायब्ररी आणि विद्यार्थी अभ्यासिकेचे उद्घाटन नुकतेच कल्याण येथे झाले. विमुक्त घुमंतू जनजाती विकास परिषदेचे राष्ट्रीय कार्यवाह अनिल फड यांच्या हस्ते या वाचनालयाचे उद्घाटन करण्यात आले. लोकभूमी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राहुल परदेशी यांनी परिसरातील वाचकांसाठी वाचनालय सुरू करण्याचा निर्धार केला होता. त्यानुसार, लोढा गार्डन सोसायटीच्या रजनीगंधा इमारतीमध्ये सोसायटी कमिटीच्या सहकार्याने ही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. राहुल परदेशी यांनी या जागेत पुस्तके, फर्निचर, खुर्च्या आणि लॅपटॉपची व्यवस्था केली आहे.
उद्घाटक अनिल फड यांनी राहुल परदेशी यांच्या चांगल्या उपक्रमाबद्दल कौतुक केले. ते म्हणाले: ‘‘पुस्तकांमुळे माणसाची ज्ञानाची भूक भागते आणि चांगले विचार अनेक लोकांपर्यंत पोहोचतात. पुस्तके ही राष्ट्राचा उत्तम नागरिक घडवण्यासाठी आवश्यक असलेली बाब आहे. पुस्तकांचे वाचन केल्यास आपल्या जीवनात परिवर्तन घडवून येऊ शकते. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने पुस्तकांचे वाचन करून त्यातील ज्ञानाचा उपयोग आपल्या जीवनात केला पाहिजे.’’
फड यांनी सोसायटीतील लोकांना या वाचनालयाचा जास्तीत जास्त उपयोग करण्याचे आवाहन केले.
जिल्हा सहकार विकास अधिकारी तानाजी पानसकर यांनी वाचनामुळे जीवनात होणाऱ्या सकारात्मक बदलांची माहिती दिली. तसेच, त्यांनी जास्तीत जास्त लोकांनी वाचन करावे, असे आवाहन करत डिजिटल साहित्याच्या अतिवापरामुळे होणाऱ्या संभाव्य धोक्यांची माहिती देऊन सावध केले. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून ठाणे जिल्हा सहकारी बोर्डाचे संचालक कैलास पाटील, ठाणे जिल्हा सहकार विकास अधिकारी तानाजी पानसकर, अखिल भारतीय शिक्षक साहित्य कला क्रीडा मंडळाचे अध्यक्ष नटराज मोरे आणि खान्देश हित संग्रामचे अध्यक्ष विजय पाटील उपस्थित होते. लोढा गार्डन सोसायटीचे राजेश सिंग, सुनील कोळी, शिवशंकर गुप्ता आणि अमित खांडगे यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश परदेशी यांनी केले, तर आभार दिनेश परदेशी यांनी मानले. रमाशंकर बिंद, नरेंद्र बहादूर सिंग आणि पप्पू पाटील यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.