तात्या लांडगे
सोलापूर : सोलापूर शहरातील रेशनधान्य दुकानातून पाच लाख ३० हजार शिधापत्रिकाधारकांना गव्हासोबत आता ज्वारी मिळणार आहे. अंत्योदय कुटुंबातील शिधापत्रिकाधारकांना दहा किलो गव्हाऐवजी पाच किलो गहू व पाच किलो ज्वारी दिली जाईल. प्राधान्यक्रमातील कुटुंबांना दोन किलो गव्हाऐवजी एक-एक किलो गहू व ज्वारी दिली जाणार आहे. शासनातर्फे हे धान्य मोफत मिळते.
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी, करमाळा, माढा, मोहोळ, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर या तालुक्यांना सीना नदीच्या पुराचा फटका बसला. तर उर्वरित तालुक्यांमध्ये अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. दिवाळीपूर्वी पूरग्रस्तांना जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून विशेष किट वाटप करण्यात आले. आता दिवाळीसाठी पूरग्रस्त भागातील कुटुंबांना रेशनधान्य दुकानांमधून १० किलो गहू, दहा किलो तांदळासोबत तीन किलो तूर डाळ मोफत दिली जाणार आहे.
शासनाकडून ते धान्य गोदामात आले आहे. दरवर्षी रेशन दुकानातून साखर, तेल अशा वस्तू अंत्योदय व प्राधान्यक्रमातील कुटुंबांना स्वस्तात मिळत होत्या. पण, आता अंत्योदय कुटुंबांसाठी दरमहा निश्चित झालेले (दरमहा १५ किलो गहू आणि २० किलो तांदूळ) धान्य देखील मिळत नाही. आता तर शहरातील रेशनकार्डधारकांना (अंत्योदय व प्राधान्यक्रम) नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये गव्हासोबत ज्वारीही मोफत मिळणार आहे.
‘त्या’ कुटुंबांना मोफत धान्य मिळणार
नोव्हेंबर-डिसेंबरसाठी सोलापूर शहरातील रेशनधान्य दुकानातील शिधापत्रिकाधारकांना ज्वारी दिली जाणार आहे. प्राधान्यक्रम व अंत्योदय कुटुंबांसाठी बुलडाण्यावरून ज्वारी येत आहे. अंत्योदय व प्राधान्यक्रमातील कुटुंबांना धान्य मोफत दिले जाते.
- ओंकार पडोळे, अन्नधान्य वितरण अधिकारी, सोलापूर शहर
गव्हाऐवजी ज्वारी कशासाठी...
विदर्भातील बुलडाणा जिल्ह्यात ज्वारीचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. हमीभाव केंद्रावर त्याठिकाणी शासनाने मोठ्या प्रमाणावर ज्वारीची खरेदी केली आहे. ती ज्वारी खराब होऊ नये म्हणून आता रेशनधान्य दुकानातून गोरगरीब कुटुंबांना मोफत दिली जाणार आहे. त्यासाठी गहू निम्म्याने कमी करून त्याठिकाणी ज्वारी दिली जाणार आहे. सोलापूर जिल्ह्यात दिवाळीपूर्वी पुराचे संकट आल्याने तूर्तास सोलापूर शहरातील शिधापत्रिकाधारकांना ज्वारी देण्याचा निर्णय झाला आहे. ग्रामीणमधील शिधापत्रिकाधारकांना नेहमीप्रमाणे गहू, तांदूळ मिळणार आहे.