रोह्यात मुसळधार
पिकलेली शेती जमीनदोस्त, वीजपुरवठा खंडित
रोहा, ता. १६ (बातमीदार) ः शहर व ग्रामीण भागात परतीच्या पावसाने बुधवारी (ता. १६) अक्षरशः धुमाकूळ घातला. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिक व व्यापाऱ्यांची एकच तारांबळ उडाली, तर काही काळ विद्युतपुरवठाही खंडित करण्यात आला होता. या पावसामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळले आहे.
मध्यंतरी विश्रांती घेणाऱ्या पावसाने बुधवारी वादळी वाऱ्यासहित जोरदार हजेरी लावली. दिवाळीच्या तोंडावर दमदार पाऊस बरसल्याने नागरिक आणि बाजारपेठेतील व्यापारी बांधवांची एकच धावपळ झाली. वाऱ्यामुळे बाजारपेठेतील शुभेच्छा बॅनर्स आणि बाजारात फटाके व अन्य दुकानदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, तर दुसरीकडे काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांनी वातावरणाचा अंदाज घेऊन भातकापणीला सुरुवात केली होती, मात्र अचानक आलेल्या पावसामुळे उभ्या आणि कापणी केलेल्या भातपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
परतीचा पाऊस अजून पूर्णपणे ओसरलेला नाही. आजदेखील काही भागांत पावसाची शक्यता असून, ज्यांनी भातपिकांची कापणी केली आहे, त्यांनी ते पीक तत्काळ झोडून घ्यावे. त्यामुळे पुढील नुकसान कमी होऊ शकते. येत्या ३० तारखेला हवामान खात्याने वादळी वाऱ्यासहित पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी वातावरणाचा अंदाज लक्षात घेऊन कापणी करावी. ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, त्यांनी तत्काळ आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करावेत, जेणेकरून पंचनामे करून मदत प्रक्रिया त्वरित सुरू करता येईल.
- महादेव करे, कृषी अधिकारी, रोहा तालुका
फोटो कॅप्शन :
वादळी वाऱ्यासहित कोसळलेल्या पावसात आडवी झालेली शेती