जुने नाशिक: टपाल विभागाकडून १२० देशांमध्ये दिवाळी फराळ पोचविण्याची सेवा उपलब्ध करून देण्यात आली होती. परंतु सर्वाधिक भारतीयांचे वास्तव्य असलेल्या कॅनडा आणि अमेरिका देशात मात्र बंदी होती.
बुधवारी (ता. १५) या बंदी उठल्याचे पत्र प्राप्त झाल्याने. येथेही दिवाळी फराळ पोचण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे आता या देशातही फराळाचा सुगंध दरवळणार आहे. २९ सप्टेंबरपासून ते बुधवार (ता. १५) पर्यंत तब्बल १८ देशात ७३ फराळाचे पार्सल पाठविण्यात आले आहे. त्यातून सुमारे साडेपाच लाखांचा महसूल प्राप्त झाला आहे.
नोकरी, शिक्षण तसेच विविध कामानिमित्त बहुतांशी भारतीय नागरिक इतर देशांमध्ये वास्तव्यास आहेत. दिवाळीत त्यांच्यापर्यंत दिवाळी फराळ पोचविण्याची त्यांच्या कुटुंबीयांची धडपड असते. टपाल विभागाकडून त्यांची सुविधा करून देण्यात आली आहे. सुमारे १२० देशांमध्ये टपाल विभागातर्फे दिवाळी फराळ पोचविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच विशेष पॅकेजिंग सुविधा देऊन त्यातूनही सुमारे १२ हजारांचा महसूल मिळाला आहे.
अनेकांना वेळेवर पार्सल करण्याची सवय असल्याने येत्या काही दिवसात याच प्रमाणात पार्सल बुक होऊन सुमारे पाच ते सहा लाखांपर्यंत अतिरिक्त महसूल मिळण्याची शक्यता व्यक्त केली आहे. यामुळे परदेशात राहणाऱ्या कुटुंबीयांपर्यंत मायेचा ठेवा पोचणार आहे. खासगी कुरिअरच्या तुलनेत विश्वासहार्यता, कमी वेळेत आणि कमी खर्चात फराळ विदेशातील कुटुंबीयांपर्यंत पोचत असल्याने शहरातील कुटुंबीयांमध्ये उत्साह आणि समाधानाचे वातावरण आहे.
पार्सल पाठविण्यापूर्वी सुरक्षा कारणास्तव टपाल विभागाकडून पार्सलची तपासणी करून पॅकिंग केले जात आहे. टेरिफ कर आणि इतर काही कारणास्तव कॅनडा आणि अमेरिकेत पार्सल पाठविण्यावर टपाल विभागाकडून बंदी होती. भेटवस्तूवरील टेरिफ कराचा काहीसा प्रश्न सुटल्याने तसेच इतरही कारणातून मार्ग निघाल्याने कॅनडा आणि अमेरिकेवरील पार्सल पाठवण्याची बंदी बुधवारी मागे घेण्यात आल्याचे पत्र टपाल विभागास प्राप्त झाले. या दोन्ही देशात सर्वाधिक भारतीय राहत असल्याने शहरातील या देशात पार्सल पाठवणाऱ्या नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
या देशात सर्वाधिक फराळ
टपाल विभागाच्या माध्यमातून फ्रान्स, किरीकिस्तान, जर्मनी, चायना, ऑस्ट्रेलिया, दुबई, फिनलॅन्ड, ब्रिटन, आयर्लंड, जपान, नायजेरिया, न्यूझीलॅन्ड, रशिया, व्हिएतनाम, अमेरिका, तैवान, सिंगापूर, स्वीडन अशा १८ देशात दिवाळी फराळ रवाना झाला आहे. यापैकी जर्मनी रशिया जपान फिनलॅन्ड आणि तैवान या देशात सर्वाधिक फराळाचे पार्सल करण्यात आले.
Dhantrayodashi 2025: धनत्रयोदशीच्या दिवशी या ७ शुभ वस्तू घरी आणा; लक्ष्मीमातेची कृपा सदैव राहीलफराळ पाठवण्याची व्यवस्था १२० देशात करून देण्यात आली आहे. कमी वेळेत कमी खर्चात फराळ विदेशातील कुटुंबीयांपर्यंत पोचत असल्याने फराळ पाठवण्यासाठी नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
- राजेश रनाळकर, प्रवर डाकपाल