श्रेया मेस्त्रीकडून दातृत्वाचा आदर्श
शिष्यवृत्तीची रक्कम बालिकाश्रमाला; वाढदिवसाचे औचित्य
सकाळ वृत्तसेवा
साडवली, ता. १७ : शालेय जीवनातच आपल्याकडे जे आहे त्यातले थोडे गरजूंना द्यावे, ही दातृत्वाची भावना देवरूख न्यू इंग्लिश स्कूलची दहावीत शिकणारी विद्यार्थिनी श्रेया मेस्त्री हिने प्रत्यक्षात उतरवली आहे. तिने आपला वाढदिवस देवरूख मातृमंदिर बालिकाश्रमातील मुलींसोबत साजरा केला व त्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. विशेष म्हणजे तिला शिष्यवृत्ती म्हणून मिळालेल्या सात हजाराचा धनादेशही या मुलींच्या शिक्षणासाठी अधिक्षिका कुवर यांच्याकडे सुपूर्द केला.
देवरूख शाळा नं. ४ चे विद्यार्थिप्रिय शिक्षक कृष्णा मेस्त्री यांची श्रेया ही मुलगी आहे. तिला दातृत्वाचे बाळकडू लहानपणीच मिळाले आहे. आपला वाढदिवस गोकूळ बालिकाश्रमातील मुलींसोबत साजरा करायचा, असे तिने ठरवले व ते प्रत्यक्षातही आणले. या वेळी कृष्णा मेस्त्री, कस्तुरी मेस्त्री यांसह मुख्याध्यापक मधुकर कोकणी, युयुत्सू आर्ते, वैभव कदम, शिक्षक दिलीप महाडीक, महावीर कांबळे आदी उपस्थित होते. श्रेयाने लहानपणापासून मला जे गरजू आहेत त्यांच्याविषयी आपुलकी व प्रेम वाटत आले आहे. मला जे करणे शक्य आहे ते मी करत आले आहे. मला मिळत असलेल्या शिष्यवृत्तीच्या रकमेतून वायंगणे शाळा नं. २ तसेच वरदानदेवी मंदिराला मदत केल्याचे श्रेयाने सांगितले. श्रेयाच्या या खारीचा वाटा असलेल्या दातृत्वाचे कौतुक होत आहे.
---