आंधळगाव, ता. १६ : आंधळगाव (ता. शिरूर) येथील पाझर तलावाचा सांडवा फोडल्यामुळे झालेल्या नुकसानीची शुक्रवारी (ता. १७) जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली.
काही दिवसांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने संरक्षक भिंतीचे काम करताना व महावितरण कंपनीच्या ठेकेदाराने परवानगी न घेता सांडवा फोडून तलावात विद्युत खांब उभारले होते. यामुळे तलावातील लाखो लिटर पाणी वाया गेले असून, परिसरातील शेतकऱ्यांपुढे पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे.
जिल्हा परिषदेच्या लघु व पाटबंधारे शिरूर विभागाचे उपविभागीय जलसंधारण अधिकारी ज्ञानेश थोरात यांनी ग्रामस्थांसह स्थळ पाहणी करून नुकसानीचा पंचनामा केला. तलावात काम करत असताना दोन्ही विभागांच्या निष्काळजीपणामुळे सांडाव्याचे मोठे नुकसान झाले आहे. सांडाव्याला पुन्हा मूळ स्वरूपात आणण्यासाठी तातडीने दुरुस्तीचे आदेश देण्यात येणार असल्याची माहिती थोरात यांनी दिली.
या प्रकाराबाबत संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी स्थानिक शेतकरी व ग्रामस्थांनी केली आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवक तालुका उपाध्यक्ष संदीप दिवेकर, विठ्ठल नलगे, रोहिदास कुसेकर, राजेंद्र भोसले, सुभाष कुसेकर, महादेव पाटोळे, बबन कुसेकर, अमोल थोरात, केशव कुसेकर आदी उपस्थित होते.
आंधळगाव येथील तलावाचे नुकसान झाले असून, महावितरण व सार्वजनिक बांधकाम विभाग व ग्रामपंचायतीला याबाबत पत्र देणार आहोत. तलावाच्या सांडव्याची लवकरात लवकर दुरुस्ती करून घेतली जाईल.
- ज्ञानेश थोरात, उपविभागीय जलसंधारण अधिकारी, जिल्हा परिषद लघू पाटबंधारे उपविभाग, शिरूर
तलावाच्या सांडव्याची दुरुस्ती त्वरित न केल्यास महिनाभरात भीषण पाणीटंचाईला नागरिकांना सामोरे जावे लागणार आहे. तलावाचे नुकसान करणाऱ्या संबंधित ठेकेदारावर योग्य ती कारवाई व्हावी.
- राजेंद्र भोसले, ग्रामस्थ, आंधळगाव
02439