>>अशोक बेंडाखळे
महात्मा फुले हे जाती व्यवस्थेवर प्रहार करणारे आधुनिक भारतातील पहिले बंडखोर पुरुष होत. एकोणिसाव्या शतकामध्ये इंग्रजांकरवी पाश्चात्य संस्कृतीशी हिंदुस्थानला परिचय झाला. बंगालमधील ब्राह्मो समाज तसेच फुल्यांचा सत्यशोधक समाज नव्या प्रबोधनाच्या युगाचा प्रारंभ करणारा ठरला. म्हणून फुले यांना 19 व्या शतकातील देशातील प्रबोधनाच्या चळवळीचे एक प्रमुख प्रणेते मानले जाते. महात्मा फुले यांच्या सत्यशोधक चळवळीची संशोधनातून ओळख करून देणारे ‘महात्मा फुले आणि सत्यशोधक चळवळ’ हे पुस्तक मा. प. मंगुडकर यांनी लिहिले असून पुण्याच्या संगम प्रकाशनाने (प्रकाशक स. मा. गर्गे) ते प्रसिद्ध केले आहे. (साल 1954) त्र्याहत्तर (14 +59) पानांचे हे पुस्तक आकाराने छोटे असले तरी त्यातली माहिती महत्त्वाची आहे.
सत्यशोधक चळवळीचा ऐतिहासिक विकास पाहता आपल्याला पुराणकालात जावे लागते. यात ब्राह्मणविरुध्द क्षत्रीय व इतर वर्ण यांचा झगडा होता. दुसरा कालखंड संताची सामाजिक चळवळ, संतांनी ब्राह्मणांच्या बौद्धिक दास्यावर हल्ला करून इतर जमातींना त्यांच्या गुलामगिरीतून मुक्त केले. तिसरा कालखंड जोतिबा फुले यांच्या सत्यशोधक चळवळीपासून सुरू होतो. ज्या विविध कारणांमुळे जोतिरावांची सत्यशोधक चळवळ महाराष्ट्रात सुरू झाली त्याचाही मागोवा लेखक घेतो.
उत्तरेकडे इस्लामी संस्कृतीचा परिणाम हिंदू समाजातील जाती व्यवस्थेतील विषमता कमी होण्यात झाला. कारण त्या संस्कृतीत अध्यात्मिक व सामाजिक समता होती. मात्र महाराष्ट्रात पेशवाईच्या उत्तरार्धात ब्राह्मणांचे इतर जमातीवरील जुलूम वादाला पोषक ठरले. ब्राह्मणांनी ब्रिटीश आमदानीत भराभर आंग्लविद्या आत्मसात करून सरकारी यंत्रणेतील मोठमोठय़ा हुद्याच्या जागा पटकावल्या आणि या अधिकाऱयांनी सत्तेचा वाईट उपयोग करण्यास सुरुवात केली. अशा काही कारणांमुळे जोतिरावांनी मित्रपरिवाराच्या साह्याय्याने 24 सप्टेंबर 1873 या दिवशी सत्यशोधक समाज स्थापन केला.
सत्यशोधक समाजाचे उद्दिष्ट असे होते, ब्राम्हण, भट, जोशी, उपाध्ये इत्यादी लोकांच्या दास्यत्वातून शूद्र लोकांना मुक्त करण्या करता तसेच धर्म व व्यवहारासंबंधी ब्राह्मणांच्या बनावट व कार्यसाधक ग्रंथांपासून मुक्त करण्याकरता. जोतिबांच्या हयातीत म्हणजे 1873 ते 1890 या 17 वर्षांच्या काळात या चळवळीला चांगले रूप प्राप्त झाले. वर्ण वर्चस्वाच्या अन्यायाखाली पिचून गेलेल्या बहुजन समाजामध्ये जोतिबांनी असंतोषाची ज्वाला पेटवली व तिला विधायक तत्त्वज्ञानाचे अधिष्ठानही दिले. प्रारंभीच्या काळात जोतिरावांनी चळवळीचा वैचारिक पिंड तयार केला. ब्राम्हण, मराठा, माळी, महार, मांग, धेंड इ. सर्व माणसे समान आहेत. जातीयतेची उतरंड पाडली पाहिजे. तरच समाज प्रगत होऊ शकेल हे त्यांच्या शिकवणुकीचे सार होते. त्यांनी हिंदू धर्मातील श्रुती, स्मृति, वेद पुराण यामधील अनेक सिद्धान्ताना व मतांना आव्हान दिले.
जोतिरावांच्या निधनानंतर (1889) शाहू महाराजांच्या रूपाने चळवळीला खंबीर व प्रभावी नेतृत्व लाभले, ते 1912 मध्ये. कोल्हापुरात त्यांच्या अध्यक्षतेखाली सत्यशोधक समाजाची स्थापना झाली आणि ब्राम्हण उपाध्यायाशिवाय लग्नाविधी उरकण्याच्या चळवळीला जास्त जोर आला. 1928 पर्यंत सत्यशोधक चळवळ कॉंग्रेसविरोधी आणि ब्रिटिशांना अनुकूल आढळते. त्याचे कारण ब्रिटीश राज्यकर्त्यांनी जाती व्यवस्थेस हादरा देण्याचे ऐतिहासिक कार्य केले. ब्राम्हणेत्तर वर्गाला साम्राज्यशाहीच्या पिळवणुकीपेक्षा भटशाहीचा जाच बोचक वाटत होता. साहजिकच या वर्गाच्या नेत्यांचे व पाठीराख्यांचे प्रेम ब्रिटिशांच्या बाजूने राहिले.
1920 नंतर मात्र ब्राम्हणेत्तर चळवळीचे मूळचे सामाजिक स्वरूप कमी होऊन तिला राजकीय स्वरूप प्राप्त झाले आणि ते 1920, 1923 आणि 1926 मध्ये कौन्सिल निवडणुकांमध्ये दिसून आले. 1923 च्या निवडणुकीत ब्राम्हणेत्तर पक्ष व मुसलमान प्रतिनिधी यांनी मंत्रिमंडळ बनवले. मंत्रिमंडळात भास्कराव जाधव शिक्षणमंत्री झाले. त्यांनी ब्राह्मणेतर समाजात शिक्षणाचा भरपूर प्रसार केला. 1921-29 पर्यंत सत्यशोधक समाजाचे मराठी मुंबई लेजिस्लेटिव्ह कौन्सिलमध्ये होते. त्यांनी काही कायदे पास करून ब्राम्हणेत्तर समाजाच्या प्रगतीस हातभार लावला. 1929 नंतर सत्यशोधक चळवळीचे नेते राष्ट्रीय चळवळीमध्ये म्हणजे कॉंग्रेसमध्ये सामील झाले. तसेच देशात हिंदू मुस्लिम वादामुळे या चळवळीचा जोर ओसरला. ब्राम्हण-ब्राम्हणेत्तर वाद मागे पडला.
[1945च्यानिवडणुकाहोईपर्यंतअनुयायीकॉंग्रेसमध्येहोतेनंतरशंकररावमोरेयांच्यानेतृत्वाखालीशेतकरीकामगारपक्षस्थापनझाला(1947)सत्यशोधकचळवळीचीमूळविशालसमतेचीभूमिकायापक्षातआलीनाहीहेसत्यआहेजोतिबांनीसातत्यानेजातीभेदधर्मभेदआणिराष्ट्रभेदयावरटीकाकेलीराष्ट्रवादहाआक्रमकअसूनतोयुद्धपिपासूआहेआणिमानवानेयाखोटय़ाअभिमानापासूनअलिप्तराहावेहात्यांचाविचारआजच्याकाळातमहत्त्वाचाआहे
(लेखक ज्येष्ठ साहित्यिक आहेत.)