स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत.इच्छुकांची सर्व पक्षात चाचपणी सुरु आहे. ज्या भागात कमकुवत नेतृत्व आहे तेथे बाहेरील पक्षातून उमेदवार आयातीची तयारी सुरू आहे. दिवाळी पक्षप्रवेशाचे फटाके फुटण्याची सुरवात झाली आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येणाऱ्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना अजित पवार यांनी शब्द दिला आहे.
दौंड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात झालेल्या पक्ष प्रवेश सोहळा व संवाद मेळाव्यात अजित पवार यांनी ही पक्षात प्रवेश करणाऱ्यांना ही ग्वाही दिली आहे. माजी आमदार रमेश थोरात ,दौंड शुगरचे संचालक वीरधवल जगदाळे, पक्ष प्रवक्ता वैशाली नागवडे, जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, आदी उपस्थित होते. भारतीय जनता पक्षाचे माजी शहराध्यक्ष तथा उद्योजक स्वप्नील शहा, माजी नगरसेवक नंदकुमार पवार, माजी सरपंच मनोज फडतरे यांनी समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून योग्य उमेदवारांसह तरूण व अनुभवींना संधी दिली जाईल. पक्षात प्रवेश करणाऱ्यांना 'आगीतून उठलो आणि फुफाट्यात पडलो,' असे वाटण्याची वेळ मी येऊ देणार नाही. मी कामाचा, स्वच्छतेचा आणि शब्दाचा पक्का माणूस आहे. माझ्या सगळ्या संस्था उत्तम चाललेल्या आहेत. राज्याचा लौकिक वाढविण्यासाठी मला साथ द्या, मी कुठे कमी पडणार नाही,' अशी ग्वाही अजितदादांनी दिली.
पक्ष प्रवेशावर बोलताना अजितदादा म्हणाले, "पक्षातील लोकांनी विश्वासाने राहावे. दिवसा ज्याच्यासोबत आहात त्याच्यासोबत रात्री पण राहा, नाहीतर काही मंडळी दिवसा काम एकाचे आणि रात्री दुसऱ्याची चर्चा करतात. पक्षात राहून दुसऱ्यांची एजंटगिरी करून काही भलं होणार नाही. एका रेषेने चाललो तर पुढे जाता येईल. चांगली माणसे निवडून द्या,"
अजित पवार म्हणाले, "राज्यघटनेने प्रत्येकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला असल्याने दौंड तालुक्यातील पोलिस व अन्य शासकीय विभागांनी नियमानुसारच नागरिकांची कामे करावीत. सत्ता आहे म्हणून मस्ती दाखवू नका. कोणाच्या सांगण्यावरून खोटे गुन्हे आणि चुकीची कामे न करता, जे करायचे ते नियमानुसारच करावे. सरकारे येतात आणि जात असतात. सगळेच जण आहे त्याच ठिकाणी राहतात,"
चार दिवस सासूचे -चार दिवस सुनेचे..."चार दिवस सासूचे तसे चार दिवस सुनेचे असतात' हे दौंड तालुक्यातील शासकीय विभागांनी लक्षात ठेवावे. आपल्याकडून लोकांची कामे होतात का नाही ?, हे तपासून दर्जेदार विकासकामे कशी पूर्ण होतील, याचा विचार करा. कृत्रिम बुध्दिमता व गुणवत्तेला महत्व आहे. त्याचा कृषी उत्पन्न वाढविण्यासाठी वापर होत आहे व ते यशस्वी प्रयोग मी केलेले आहे.
विकासकामे करताना नुसता निधी आणून भागत नाही. ती कामे करण्यासाठी कष्ट घ्यावे लागतात, कामाच्या ठिकाणी जाऊन लक्ष द्यावे लागते, अडचणी समजून घ्याव्या लागतात. सर्वांना बरोबर घेऊन पुढे जाण्याची भूमिका स्वीकारून दर्जेदार कामे उभी करावी लागतात. दुजाभाव करून चालत नाही," असे अजितदादा म्हणाले. यावेळी अजित पवार यांच्याकडे स्वप्नील शहा यांनी पूरग्रस्त मदत निधी म्हणून १ लाख ५५ हजार ५५५ रूपयांचा धनादेश सुपूर्द केला.