यंदाच्या महिला वर्ल्ड कपमध्ये मोठ्या अपेक्षा असणाऱ्या टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पराभव केला. भारताने हा सामना तीन विकेट्सनी गमावला.
या सामन्यात भारताचा पराभव झाला असला तरी ऋचा घोषची स्फोटक खेळी मात्र सर्वांच्या कायम लक्षात राहील.
तिने 77 चेंडूत 11 चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने 94 धावांची आक्रमक खेळी खेळून भारताला संकटातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, तिला टीम इंडियाचा पराभव टाळता आला नाही.
ऋचाच्या या आक्रमक शैलीमागे तिचे वडील मानवेंद्र घोष यांची महत्त्वाची भूमिका असल्याचे दिसून येते.
खरंतर लहानपणी प्रशिक्षक तिला ड्राइव्ह मारायला, चेंडू जमिनीवर खाली ठेवायला आणि बेसिक्स शिकायला सांगत होते.
पण तिचे वडील मानवेंद्र तिला म्हणायचे, 'तू बिनधास्त मार'. या प्रोत्साहनामुळेच आक्रमक आणि स्फोटक शैलीतील बॅटर म्हणून ऋचा आज क्रिकेट विश्वात समोर आली आहे.
ऋचा जेव्हा फलंदाजी करण्यासाठी आली, तेव्हा भारताच्या 102 धावांवर 6 विकेट्स पडल्या होत्या. भारतीय संघ 150 धावांपर्यंत तर जाईल की नाही, अशी चर्चा रंगली होती. परंतु, ऋचाच्या खेळीने सामन्याचा रंगच बदलला.
ऋचाने केला विश्वविक्रमऋचाने वनडे सामन्यात आठव्या क्रमांकावर येत फलंदाजीतील नवा विक्रम नोंदवला आहे.
ऋचाच्या 94 धावांच्या खेळीपूर्वी दक्षिण आफ्रिकेच्या क्लोई ट्रायॉनच्या नावावर 74 धावांचा विक्रम होता. हा विक्रम तिने याच वर्षी 9 मे रोजी श्रीलंकेविरुद्ध केला होता.
ऋचाची या वर्ल्ड कपमधील ही सर्वोत्तम धावसंख्या आहे. तर तिच्या वनडे करिअरमधला दुसरा सर्वोत्तम स्कोअर आहे. 96 ही तिची आतापर्यंतची सर्वोत्तम धावसंख्या आहे. जी तिने 2023 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध मुंबईच्या वानखेडे स्टेडिअवर केली होती.
वर्ल्ड कप आणि वनडे करिअरमध्ये पहिलं शतक झळकवण्याची ऋचासाठी ही उत्तम संधी होती. परंतु, टीमची धावसंख्या वाढवण्याच्या प्रयत्नात ती शतकापासून फक्त सहा धावा दूर राहिली.
मधल्या फळीचं अपयश ऋचाने कसं हाताळलं?भारतीय संघ कठीण परिस्थितीत असताना ऋचा घोष मैदानात आली. कदाचित त्या दबावामुळेच तिने पहिल्या सहा चेंडूवर एकही धाव काढली नाही.
त्या वेळी विशाखापट्टणमच्या व्हीडीसीए स्टेडियममध्ये पूर्ण शांतता पसरली होती.
ऋचाने ट्रायॉनला लॉफ्टेड शॉट मारून जेव्हा पहिली धाव घेतली, तेव्हा प्रेक्षकांच्या आवाजाने मैदान पुन्हा गजबजलं. या शॉटमुळे तिने 86 चेंडूपासून शांत बसलेल्या स्टेडियमला जागं केलं. तरीसुद्धा ती सावधपणे खेळत होती आणि 21 चेंडूत फक्त 11 धावा केल्या होत्या.
खरं तर ऋचा अर्धशतकापर्यंत शांत आणि संयमाने खेळत होती. पण त्यानंतर तिने असा आक्रमक खेळ दाखवला, जो महिला क्रिकेटमध्ये क्वचितच पाहायला मिळतो.
जेव्हा ऋचा गोलंदाजी पण करत होतीऋचा घोष पश्चिम बंगालच्या सिलीगुडीची आहे. टीम इंडियाचा माजी विकेटकीपर रिद्धिमान साहा देखील याच शहराचा आहे. त्याच्यापासून प्रेरणा घेऊन ऋचाने सुरुवातीपासूनच विकेटकीपर फलंदाज होण्यावर लक्ष केंद्रित केलं.
सीनियर टीमच्या कॅम्पमध्ये गेल्यावर प्रशिक्षकाने तिला विकेटकीपिंगऐवजी गोलंदाजी करण्याचा सल्ला दिला. मग त्यानंतर तिने गोलंदाजी सुरू केली. बंगालसाठी खेळताना तिने अनेक वेळा गोलंदाजी केली आहे.
पण 2020 मध्ये भारतीय टी-20 संघात निवड झाल्यावर तिने पुन्हा विकेटकीपिंग सुरू केली. त्यानंतर तिने कधीही या जबाबदारीपासून स्वतःला दूर केले नाही.
टेबल टेनिस खेळावं, अशी होती वडिलांची इच्छासामान्यतः क्रिकेटर आधी त्यांच्या वयोगटातील संघात खेळतात आणि नंतर सीनियर टीममध्ये येतात. परंतु, ऋचाची गोष्ट अगदी याच्या उलट आहे.
ऋचा आधी सीनियर टीमबरोबर टी-20 वर्ल्ड कप आणि मग वनडे वर्ल्ड कप खेळली. त्यानंतर 2023 मध्ये तिची अंडर-19 वर्ल्ड कपच्या संघात निवड झाली.
शेफाली वर्माच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाने अंडर-19 वर्ल्ड कपचे विजेतेपद पटकावले. ऋचा ही तेव्हा संघातील महत्त्वाची खेळाडू होती. महत्त्वाचं म्हणजे या वर्ल्ड कपमध्ये सहभागी होण्यापूर्वीच तिने जागतिक स्टारचा दर्जा मिळवला होता.
ऋचाच्या वडिलांना तिला टेबल टेनिस खेळाडू बनवायचं होतं. त्यासाठी त्यांनी तिला लहानपणीच टेबल टेनिस अकादमीमध्ये घातलं. पण ऋचाचं मन टेबल टेनिसमध्ये लागलं नाही. कारण तिला क्रिकेटर व्हायचं होतं.
ऋचाचे वडील मानवेंद्र घोष स्वतःही क्लब स्तरावर क्रिकेट खेळले आहेत. ते जेव्हा क्लबमध्ये सरावाला जात, तेव्हा चार वर्षांच्या ऋचालाही सोबत घेऊन जात. कारण अन्य खेळाडूंची मुलंही तिथे येत असत.
सिलीगुडीमध्ये महिला क्रिकेटच्या प्रशिक्षणाची सोय नसल्यामुळेच मानवेंद्र घोष तिला क्रिकेटर बनवू इच्छित नव्हते.
परंतु, तिच्या इच्छेवरून त्यांनी आधी तिला मुलांच्या संघासोबत खेळवलं आणि नंतर कोलकाता येथे जाऊन तिला प्रशिक्षण देऊ लागले.
ऋचाच्या क्षमतांवर मानवेंद्र घोष यांना विश्वास होता. त्यामुळे तिला क्रिकेटर बनवण्यासाठी काही काळ त्यांनी आपला व्यवसाय बंद केला.
ऋचाचा भारतीय संघात समावेश झाल्यानंतर त्यांनी पुन्हा आपला व्यवसाय सुरू केला.
भारतीय संघात येताच धमाकाभारतीय संघाकडून टी-20 खेळल्यानंतर वयाच्या 18 व्या वर्षी ऋचाने वनडे संघातही स्थान मिळवलं.
भारतीय खेळाडूंमध्ये सर्वात वेगाने अर्धशतक ठोकून तिने आपली ताकद दाखवून दिली. ही गोष्ट 2021 ची आहे.
ऋचाने केवळ 26 चेंडूमध्ये अर्धशतक ठोकून रूमेली धरचा प्रदीर्घ विक्रम मोडला. रूमेलीने 2008 मध्ये श्रीलंकेविरोधात 28 चेंडूत अर्धशतक ठोकून नवा विक्रम रचला होता.
ऋचाच्या नावावर टी-20 क्रिकेटमध्ये सर्वात वेगाने अर्धशतक ठोकण्याचा संयुक्त विक्रम आहे. डिसेंबर 2024 मध्ये तिने वेस्ट इंडिजविरुद्ध अवघ्या 18 चेंडूत अर्धशतक झळकावलं होतं. त्यात तिने 3 चौकार आणि 5 षटकार मारले होते.
धोनीला मानते आदर्शऋचा नेहमी सांगते की, तिचा आदर्श महेंद्रसिंह धोनी आहे. धोनीला मैदानावर शॉट्स मारताना पाहून ती मोठी झाली आहे.
ती म्हणते, मी लहानपणापासून धोनीला फॉलो करते. तो सामना कसा फिनिश करतो हे मी पाहायची.
धोनीला अद्याप भेटता आलेलं नाही, याची ऋचाला खंत आहे. पण ती धोनीसारखं शेवटपर्यंत विकेटवर टिकून राहून विजय मिळवण्यावर विश्वास ठेवते. ती धोनीसारखं लांब षटकार मारण्यातही पटाईत आहे.
ऋचा तिच्या करिअरच्या सुरुवातीच्या टप्प्यात आहे. ती जर अशाच प्रकारे खेळत राहिली, तर जगातील एक अव्वल दर्जाची खेळाडू म्हणून नावलौकिक मिळवू शकते.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.