आळंदी, ता. २० : येथील एका महाराजांच्या नेक्सन मोटारीला अन्य एका इनोव्हा वाहनाने ठोकर देऊन शिवीगाळ केली. तसेच, महाराजांची गाडी पेटवून देईल, अशी धमकी दिल्याप्रकरणी एकावर आळंदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. माधव पंढरीनाथ सोळंके (रा. घुंडरे गल्ली, आळंदी), असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे.
आळंदी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना आळंदीत शनिवारी (ता. १८) घुंडरे गल्लीमध्ये घडली. याप्रकरणी फिर्याद रामेश्वर जगन्नाथ ढाकणे या कीर्तनकार महाराजांनी दिली. घुंडरे गल्लीतील पवन मावळ धर्मशाळाच्या पाठीमागे संतकृपा धर्मशाळेसमोर माधव सोळंके यांनी त्याच्याकडील इनोवाने (क्र. एम.एच. १२ एन.ई. ७७७०) जोरात आणि अविचाराने जाणीवपूर्वक दोन वेळा मागे पुढे घेऊन फिर्यादी ढाकणे यांच्या नेक्सन (क्र. एम.एच. १४ एल.वाय. ९९२५) मोटारीला जोराची धडक दिली आणि नुकसान केले. तसेच, रस्त्याच्या बाजूला उभे असलेल्या लोकांच्या जीवितास धोका होईल, असे कृत्य करून त्यांना शिवीगाळ केली. तसेच, गाडी पेटवून देण्याची धमकी दिली.