रस्त्यांची स्वच्छता 'कचऱ्यात'
esakal October 21, 2025 12:45 PM

पिंपरी, ता. २० : औंध-रावेत बीआरटी मार्गाची स्वच्छता नियमित होत नसल्याने रस्त्यांवर मातीचे थर जमले आहेत. विशेषत: ताथवडे आणि पुनावळे परिसरातील बीआरटी मार्गावर गवत, कागद, प्लॅस्टिक आणि माती साचली आहे. वेळेत स्वच्छता न झाल्यामुळे या मार्गांवर बकालपणा निर्माण झाला आहे. रावेत-भक्ती-शक्ती बीआरटी मार्गावरही अशीच परिस्थिती आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेने शहरातील १८ मीटरहून अधिक रुंदीच्या रस्त्यांची यांत्रिकी पद्धतीने साफसफाई करण्यासाठी अत्याधुनिक मशिन खरेदी केल्या आहेत. याद्वारे मुख्य रस्त्यांवरील स्वच्छता केली जात असली, तरी उपनगरांतील मोठ्या रस्त्यांकडे मात्र आरोग्य विभागाचे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार नागरिक करत आहेत. याबाबत काही स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘‘चिखली-जाधववाडी-डुडूळगाव मार्ग, दापोडी-निगडी बीआरटी मार्गदेखील नियमित स्वच्छ केला जात नाही. पावसाळ्यात ओलाव्यामुळे धुळीचा त्रास कमी जाणवत होता; मात्र पाऊस थांबताच परिस्थिती बदलली आहे. उपनगरांतील बहुतांश रस्त्यांवर आता धुळीचे कण हवेत पसरत आहेत. रस्त्यांवर साचलेली धूळ आणि कचरा मोठ्या वाहनांमुळे उडून प्रदूषण वाढत आहे.’’

धुळीमुळे नागरिकांना श्वसनाचा आजार
गेल्या काही दिवसांत नागरिकांना ॲलर्जी, खोकला, दमा यांसारख्या श्वसनविकारांचा धोका वाढला आहे. त्यामुळे शहर-उपनगरांतील मार्गांवर तातडीने यांत्रिकी साफसफाई सुरू करण्याची मागणी होत आहे. स्वच्छ शहराचा दर्जा राखण्यासाठी उपनगरांतील बीआरटी मार्गांवरही नियमित स्वच्छता मोहीम राबविणे अत्यावश्यक असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे. तसेच, चिंचवड येथील मंगलमूर्ती वाड्यासमोर झाडांच्या फांद्या पडल्या आहे. तेथे दर्शनासाठी येणाऱ्यांची गर्दी होत असताना हा बकालपणा वाढला आहे.

ताथवडे आणि पुनावळे परिसरातील रस्त्यांची साफसफाई वेळेत होत नाही. बीआरटी मार्गांत गवत वाढले असून माती, प्लॅस्टिक आणि कागद लोखंडी बॅरिकेडलगत साचले आहेत, पण ते उचलले जात नाहीत. पुनावळे येथील बीआरटी मार्गात सफाई केली असली, तरी साचलेली माती ठिकठिकाणी साठवण्यात आली आहे. आता पाऊस उघडल्यानंतर तीच माती हवेत उडून प्रदूषण होत आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन स्वच्छता करावी.
- संदीप म्हेत्रे, रहिवासी, ताथवडे

शहरातील १८ मीटरहून अधिक रुंदीचे रस्ते यांत्रिकी पद्धतीने नियमित स्वच्छ केले जातात. औंध-रावेत, निगडी-दापोडी, रावेत-भक्ती-शक्ती किंवा इतर मार्गांवर स्वच्छतेबाबत संबंधित क्षेत्रीय कार्यालयांच्या आरोग्य यंत्रणांना तत्काळ आदेश दिले जातील.
- सचिन पवार, उपायुक्त आरोग्य विभाग, महापालिका

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.