अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमधून काही धक्कादायक फोटो सध्या समोर आले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या महत्त्वाकांक्षी नवीन बॉलरूम प्रकल्पाचा एक भाग म्हणून व्हाईट हाऊसच्या ईस्ट विंगच्या काही भागाचे तोडकाम करण्याचे काम सुरु आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बांधकाम कर्मचारी उत्खनन यंत्रांच्या मदतीने ईस्ट विंगचे छत, प्रवेशद्वार आणि खिडक्यांचे तोडकाम करत असल्याचे फोटो व्हायरल होत आहे. द वॉशिंग्टन पोस्ट आणि सीएनएनसह अनेक माध्यमांनी या तोडफोडीचे फोटो प्रसिद्ध केले आहेत.
सुमारे २५० दशलक्ष डॉलर (₹२,०८५ कोटी) खर्च असलेला हा प्रकल्प गेल्या अनेक वर्षातील व्हाईट हाऊसमधील सर्वात मोठ्या बदलांपैकी एक आहे. व्हाईट हाऊसने ‘ट्रुथ सोशल’वर याची पुष्टी केली आहे. यात त्यांनी ईस्ट विंगच्या काही भागांमध्ये उत्खनन आणि तोडफोडीचे काम सुरू आहे. हा बॉलरूम राष्ट्रपती आयोजने, राजनैतिक समारंभ आणि डिनरसाठी बनवला जात आहे. ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार, गेल्या १५० वर्षांपासून प्रत्येक राष्ट्राध्यक्षाचे हे स्वप्न होते. हा प्रकल्प करदात्यांवर कोणताही बोजा न टाकता, उदार देशभक्त आणि कंपन्यांच्या खासगी योगदानातून पूर्ण करण्यात येणार आहे.
हा बॉलरूम सुमारे ९०,००० चौरस फूट (जवळपास ८,३०० चौरस मीटर) क्षेत्रात बनवला जात आहे. जो सध्या ईस्ट विंगच्या जागेवर स्थित आहे. व्हाईट हाऊसने जारी केलेल्या डिझाईन्समध्ये दर्शविले आहे की, या विशाल हॉलमध्ये सोनेरी आणि क्रिस्टल झुंबर, सोनेरी नक्षीकाम केलेले स्तंभ, सोन्याच्या थरांसह छताची रचना, संगमरवरी फरशी आणि तीन भिंतींवर सदर्न लॉनकडे उघडणाऱ्या खिडक्या असतील.
व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट यांच्या म्हणण्यानुसार, नवीन बॉलरूममध्ये जवळपास ६५० लोकांना बसण्याची सोय असेल. जी सध्याच्या ईस्ट रूमच्या क्षमतेपेक्षा तिप्पट आहे. ईस्ट रूम आतापर्यंत व्हाईट हाऊसचा सर्वात मोठा इवेंट हॉल होता.
ईस्ट विंगचे बांधकाम १९०२ मध्ये झाले होते आणि १९४२ मध्ये राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन डी. रूझवेल्ट यांच्या कारकिर्दीत यात शेवटचे बदल करण्यात आले होते. हा भाग दीर्घकाळ ‘फर्स्ट लेडी’ (राष्ट्राध्यक्षांची पत्नी) च्या कार्यालयासाठी वापरला जात आहे. ट्रम्प यांच्या आधुनिकीकरण योजनेनुसार, या विंगला पूर्णपणे नवीन आणि आधुनिक रूप दिले जाईल.